राहुरी: देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–मनमाड महामार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघाती रक्तपात झाला. रस्त्याच्या कामातील प्रचंड दिरंगाई, रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक यामुळे एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाले. यात १८ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून तिघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा मृत्यू नसून प्रशासनाने घडवलेला खून असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.
पहिल्या अपघातात गोटुंबा आखाडा येथील संकेत सखाराम बाचकर (वय १८) हा बी.एस्सी. ॲग्रीचा विद्यार्थी आपल्या मित्रासह ध्वजारोहणासाठी दुचाकीवरून जात असताना गाडगे आश्रम शाळेसमोर ट्रकने त्याला चिरडले. रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे आणि वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे हा अपघात झाला. ट्रकखाली आल्याने संकेतचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र श्रीकांत हापसे (वय २१) याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
पहिली घटना ताजी असतानाच काही वेळातच राहुरी बस स्थानकासमोर दुसरा भीषण अपघात झाला. खडीवरून दुचाकी घसरल्याने प्रसाद गागरे (वय १८) आणि सार्थक आहेर (वय १९) या तरुणांना आयशर टेम्पोने उडवले. या अपघातात प्रसाद गागरे याचा हाताचा पंजा चेंदामेंदा झाला असून पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला आहे.
या दोन्ही अपघातांना अहिल्यानगर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदार कंपनी थेट जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता रस्त्यावर खडी टाकून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यात आला आहे. अवजड वाहतूक सुरू ठेवून प्रशासनाने जणू मृत्यूला खुले आमंत्रण दिले आहे.
एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतरही प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने तातडीने अवजड वाहतूक बंद करावी, रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे व जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा राहुरीत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिक व रस्ता दुरुस्ती कृती समितीने दिला आहे.