

श्रीरामपूर: एकास 20 हजार रूपये उसणे मागितले असता, त्यांनी ते दिले नाही म्हणून दोघांनी त्यांची थार कंपनीचे चारचाकी वाहन पेटवले. शहरातील वॉर्ड नं.2 मध्ये हा थरार घडला. सलीम महंमद अब्दुल सत्तार शेख यांचा मित्र समीर सुलेमान शेख, (रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची थार गाडी (क्र. एमएच 20 एचबी 9592) ही सलीम शेख तीन महिन्यांपासून वापरत आहे.
वाहन मिल्लतनगर येथे पाटाच्या कडेला ते लावतात. सायंकाळच्या सुमारास सलीम शेख यांना, सद्दाम कुरेशी याचा फोन आला. तो म्हणाला की, ‘शाहरूख आर्थिक अडचणीत आहे. त्याला 20 हजार रूपये उसणे दे, परंतू माझ्याकडे पैसे नाहीत, असे त्यांनी सांगितले. यावर, ‘तू पैसे दिले नाही तर, आमच्या पद्धतीने बघतो,’ असे ते म्हणाले. यानंतर सद्दाम कुरेशी व शाहरूख व त्यांच्यासमवेत चार अनोळखी इसम थार गाडीकडे जाताना दिसले.
सलीम शेख तिकडे जात असताना, वाहनाची त्यांनी तोडफोड करून, काचा फोडून ते पेटवले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सलीम महंमद अब्दुल सत्तार शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सद्दाम कुरेशी, शाहरूख (पूर्ण नाव माहित नाही) व चार अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.