Akshay Kardile Rahuri Victory Pudhari
अहिल्यानगर

Akshay Kardile Rahuri Victory: राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विक्रमी विजय; भाजपचा ‘अक्षय’ जलवा कायम

विखे-जगताप रणनीतीचा प्रभाव; कर्डिले घराण्याच्या वारशावर मतदारांचा शिक्का

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर: दिवंगत आ. शिवाजी कर्डिले यांंनी बांधलेले भक्कम संघटन... स्वकृर्तत्वासोबतच विखे-जगताप नावाची शक्ती पाठीशी असल्याने अक्षय कर्डिले यांनी विक्रमी मताधिक्याने राहुरीची आमदारकी जिंकली. राहुरीतील भाजपचा ‌‘अक्षय‌’ विजय तर झालाच; पण विरोधकांना त्यांची जागा दाखवत भुईसपाट करण्याची किमया कर्डिले यांनी केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप या जोडगोळीने केलेले परफेक्ट नियोजन अक्षय कर्डिले यांच्या रेकॉर्ड ब्रेक विजयाचे खरे गमक ठरले.

सामान्य असलेले शिवाजीराव कर्डिले असामान्य झाले, ते जनहिताच्या भूमिकेमुळेच. नगर-नेवाशातून तीनदा आणि राहुरीतून तीनदा आमदार राहिलेले स्व. कर्डिले यांनी जनतेशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. रात्रीचा दिवस करताना त्यांनी सामान्यांना न्याय मिळवून दिला. संघटन बांधणीचे कौशल्य अंगी असलेले स्व. कर्डिले यांचा पक्षपातळीवरही तितकाच प्रभाव होता. त्यांच्या अचानक निधनाने सगळेच कोलमडून पडले.

त्यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. अक्षय कर्डिले यांनाच भाजपने उमेदवारी देत बिनविरोधासाठी प्रयत्न केले, मात्र अपयश आले. पण माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना थांबविण्याची किमया अनुभवी नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधली. अर्थात त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मदत झाली. बिनविरोधासाठी प्रयत्न करूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिलाच, शिवाय उबाठा सेनेच्या शिलेदारानेही बंडखोरी केली. पण हे गृहीत धरूनच विजयाच्या गणिताची विखे-जगताप यांनी आखणी केली होती. त्यामुळे समोरचा उमेदवार कोण? यापेक्षा अक्षय कर्डिले काय करू शकतात, पक्ष त्यांच्या मागे भक्कमपणे उभा असल्याचा संदेश देण्यात विखे-जगताप यशस्वी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीच्या सभेत ‌‘बीअरर चेक‌’ देऊन जात असल्याचे सांगत अक्षय यांच्या मागे उभे असल्याचा संदेश दिला.

स्वत: कोणतीही निवडणूक न लढविलेले अक्षय नवखे असले तरी आ. जगताप व सुजय विखे पाटील यांनी रणनीती आखली, त्याप्रमाणे अक्षय यांची वाट‌‘चाल‌’ राहिली, परिणामी लखलखता विजय खेचून आणता आला. भाजपच्या ‌‘अक्षय‌’ विजयाने मताधिक्याचा विक्रम केलाच पण विरोधकाचे पुरते पानिपत केले. निवडणुकीतील विजयाबरोबर मतदारांनी स्व. कर्डिले यांच्या वारशावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना राजकारणात स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांनी घेतलेली गरुडझेप पाहता राजकारणातील चाणक्य नेतृत्व म्हणून त्यांची ओळख झाली. सहा टर्म आमदार असलेले स्व. कर्डिले यांनी प्रस्थापितांना धक्क्यावर धक्के दिल्याचे अनेकांनी अनुभवले, पाहिले. स्वर्गीय कर्डिले यांच्या कामाची पद्धत व सर्वसामान्य शेतकरी, महिला वर्गाच्या समस्यांची जाण तसेच समस्यांचे निराकरण करण्याचे कसब अन्‌‍ दांडगा जनसंपर्क यामुळे स्व. कर्डिले मतदारांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

त्यांच्या अकाली निधनाने तीस वर्षांच्या अक्षय यांच्यावर कार्यकर्त्यांची तसेच विकास कामांची मोठी जबाबदारी पडली. समाजकारण, राजकारणाचे धडे अक्षय यांना बालवयापासून घरातूनच मिळाले होते. हिंदुत्वाचे कार्ड तसेच तरुणांचे संघटन अक्षय यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवत राहुरीच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ‌‘बॉस‌’ म्हणून ओळख निर्माण करण्यात अक्षय कर्डिले यशस्वी झाले. निवडणूक फक्त सहानुभूतीची लाट नसून कर्डिले घराण्याचा दीर्घकालीन जनसंपर्क, संघटनशक्ती अन्‌‍ मतदारांशी असलेल्या भावनिक नात्याचा विजय असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदारांनी स्व.कर्डिले यांच्या वारसदारासोबतच भविष्यातील नेतृत्व म्हणून अक्षयला स्वीकारले. अक्षय कर्डिले समर्थकांनी शांतपणे केलेल्या मतांची बांधणी निकालात स्पष्ट दिसून आली.

अभ्यासू, नम्र, निष्कलंक

स्व.आमदार शिवाजी कर्डिले यांनी उभे केलेले साम्राज्य त्यांच्या पश्चात अक्षय यांनी कोसळू दिले नाही. मतदार संघातील जनतेने कर्डिले घराण्याच्या नव्या वारसाला दिलेला कौल हा सत्ताभिषेक म्हटल्यास वावगे ठरू नये. राहुरीच्या राजकारणात अक्षय यांच्या रूपाने नवा अध्याय सुरू झाला आहे. युवा चेहरा, अभ्यासू प्रतिमा, नम्र संवेदनशैली अन्‌‍ निष्कलंक म्हणून अक्षय कर्डिले यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी केलेले तरुणांचे संघटन त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT