राहुरी: राहुरी बाजार समिती सन 2024-25 या अहवाल सालात एकूण आठ कोटी 98 लाख 16 हजार वाढवा मिळाला आहे. बाजार समिती व्यवस्थापन व प्रशासकीय खर्च मिळून तीन कोटी 91 लाख 7 हजार रुपये खर्च होऊन बाजार समितीस निव्वळ वाढावा पाच कोटी सात लाख नऊ हजार रुपये झाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या शेतकरी निवास सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बाजार समितीकडे एकूण 18 कोटी 70 लाख रुपयांच्या मुदत ठेवी असून या व्यतिरिक्त बाजार समितीने सर्व विकासकामे स्वनिधीतून पूर्ण केली आहे. (Latest Ahilyanagar News)
यासाठी गेल्या 22 वर्षापासून सभापती पदाची धुरा सांभाळताना सर्व संचालकांनी व्यापारी हमाल मापाडी व बाजार समितीचा प्रमुख कण असलेल्या शेतकरी बंधूंची मोठी साथ मिळाली असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
बाजार समितीकडून मुळा सूतगिरणीची तेरा एकर जमीन खरेदी करून या ठिकाणी जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर जिनिंग मिलचे काम प्रगतीपथावर असून लवकरच जिनिंग मिल सुरू करण्यात येईल व तसेच या ठिकाणी मोठा फळाचा बाजार व मोकळा कांदा लिलाव सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बाजार समितीकडून मिशन कंपाउंडमधील वाय एम सी ए मैदानाची जवळपास सव्वातीन एकर जागेची व्यवहार प्रक्रिया पूर्ण झाली असून 30 टक्के रक्कम अदा केली आहे. उर्वरित रक्कम देऊन येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात सदर जागा बाजार समितीच्या मालकीची होईल या ठिकाणीही भाजीपाला इतर व्यापाऱ्यांसाठी जवळपास 65 गाळ्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
गेल्या वर्षी बाजार समितीला जवळपास एक कोटीचा वाढावा मिळाला होता. गेल्या चार वर्षात यात वाढ होऊन अहवाल सालात जवळपास पाच कोटीच्या वर निव्वळ वाढावा मिळाला आहे. बाजार समितीकडून सोनगाव, सात्रळ या ठिकाणी जागेचा शोध सुरू असून तेथे उपबाजार सुरू करण्याचा मानस आहे.
त्याचप्रमाणे वांबोरी, राहुरी येथील व्यापारी व शेतकऱ्यांना सर्व रस्ते शेड व इतर सुविधा स्वनिधीतून पूर्ण करून देण्यात आल्या आहेत. राहुरी बाजार समितीला शासनाच्या वतीने अनेक पारितोषिके देऊन गौरविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बाजार समिती ही सभासदांच्या नाही तर शासनाच्या मालकीची असल्याने कारखान्यास आर्थिक मदत समितीकडून करण्यासाठी शासकीय नियमात येत नसल्याची माहिती त्यांनी दिली.