राहुरी: नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांच्या साम्राज्यापुढे देशात सर्वाधिक बदनाम झालेल्या नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाची साडेसाती संपत नसल्याने बळी जातच आहे. शहरातील शशिकांत तुकाराम दुधाडे यांचा नगर-मनमाड रस्त्यावर बळी गेल्याचे समजताच शेकडो जणांनी नगर मनमाड रस्त्याचा ताबा घेतला.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये तब्बल 3 तास आंदोलकांनी ठिय्या मांडला. अखेरीस अवजड वाहतूक बंदी, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कारणीभूत असलेले अधिकारी व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन मिळताच आंदोलकांनी प्रवाशांना वाट मोकळी करून दिली. (Latest Ahilyanagar News)
राहुरी परिसरामध्ये नगर-मनमाड रस्त्यावरून रस्ता कृती समिती व प्रशासनामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही महसूल व पोलिस प्रशासनावर मोर्चा काढत नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा दिला होता. आठवड्यातच 6 बळी घेणाऱ्या नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा दोन अपघाताच्या घटना घडल्या.
एका अपघातामध्ये एक तरुण अत्यवस्थ तर दुसऱ्या अपघातामध्ये शशिकांत महाराज दुधाडे यांचा मृत्यू झाल्याची वार्ता राहुरी शहरात पसरली. धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले दुधाडे यांचे चिरंजीव डॉ. सुहास दुधाडे व लॅब टेक्निशियन संकेत दुधाडे यांच्या वडिलांच्या अपघाताची बातमी समजताच शेकडो जणांनी नगर मनमाड रस्त्याचा ताबा घेतला. माजी मंत्री तनपुरे यांच्या मार्गदर्शनात आंदोलकांनी जुने बस स्थानकासमोरील खंडोबा मंदिरासमोर ठिय्या मांडत नगर मनमाड रस्त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
याप्रसंगी माजी मंत्री तनपुरे म्हणाले की, नगर मनमाड रस्त्यावर सुमारे 300 जणांचा बळी गेला आहे. अनेक जणांना अपंगत्व आले. कोट्यवधी रुपयांचा निधी केवळ डागडुजीवर खर्च झाला. परंतु तो निधी ठेकेदार व अधिकाऱ्यांनीच लाटला. परिणामी नगर मनमाड रस्त्याची दुरुस्ती होऊनही तो काही महिनेच वाहतुकीच्या लायकीचा ठरतो.
पाऊस पडताच रस्त्यावरील डांबर गायब होतो. जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता सुरक्षित राहिलेला नाही. अवजड वाहनांच्या अधिक वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. दैनंदिन अपघातात बळी जात असतानाही प्रशासनाची बघ्याची भूमिका पाहता संताप वाढत आहे. परिणामी अपघातात मृत झालेले दुधाडे यांचा मृतदेह आम्ही रस्त्यावर घेऊन आलेलो आहे. जोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून आंदोलक उठणार नसल्याचा इशारा तनपुरे यांनी देताच प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.
दोषींवर कारवाई सोडून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची हुकूमशाही सहन करणार नसल्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. नगर मनमाड रस्ता कृती समितीचे वसंत कदम यांनी सांगितले की, नगर मनमाड रस्त्याची दुरवस्था सुधारत नसल्याने भाजपच्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकारी गाडीत आहेत हे आम्हा आंदोलकांना माहिती नव्हते. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधणे महत्वाचे होते. शिवसेना पक्षाचे रवींद्र मोरे म्हणाले की, आता संयमाचा कडेलोट झाला आहे. यापुढे नगर मनमाड रस्त्यावर पुन्हा निष्पाप बळी गेल्यास अंत्यविधी नगर मनमाड रस्त्यावरच केला जाईल.
माजी खासदार प्रसाद तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे, साहेबराव म्हसे, संभाजीराजे तनपुरे, शिंदे सेनेचे रवींद्र मोरे, देवेंद्र लांबे, कांता तनपुरे, बाळासाहेब खुळे, दत्तात्रय येवले, सुनील हिवाळे, आबासाहेब शेटे, डॉ. प्रकाश पवार, व्यापारी संघटनेचे प्रकाशसेठ पारख, केशर पतसंस्थेचे सागर तनपुरे, बाळासाहेब खुळे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके. महेश उदावंत, नंदु तनपुरे, ओंकार कासार, गजानन सातभाई, ॲड. राहुल शेटे, निलेश जगधने, डॉ. प्रविण कोरडे, सचिन म्हसे, आदींसह शेकडो जण रास्ता रोको आंदोलनात सहभागी होते.
अवजड वाहतूक बंदीचे पत्र जारी
श्रीरामपूर पोलिस उपअधीक्षक जयदत्त पवार, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी प्रशासनाच्या वतीने संवाद साधला. दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुंबई येथील अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधला. प्रशासनाकडून तत्काळ अवजड वाहतूक बंदीचे पत्र जारी करण्यात आले.
तर नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाबाबत अपघात घडत असल्याने जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले. तसेच राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलनात जिल्हाधिकारी यांची गाडी अडवली म्हणून गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांबाबत समितीमार्फत चौकशी करत न्याय देण्याचा शब्द प्रशासनाने दिला.