Crime News Pudhari
अहिल्यानगर

Rahta Crime: साधूच्या वेशात आले, महिलेवर संमोहना’चा डाव; रोकड अन् सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा!

राहाता शहरातील गिफ्ट गॅलरीत भरदुपारी धक्कादायक लूट; वारकरी वेशातील लुटीनंतर पुन्हा भामट्यांचा कारनामा

पुढारी वृत्तसेवा

राहाता: साधूचा वेश धारण करून आलेल्या दोन चोरट्यांनी एका व्यावसायिक महिलेला बोलण्यात गुंतवून व संमोहित करत लुटल्याचा प्रकार बुधवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास घडला. चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम तसेच बोटातील सोन्याच्या दोन अंगठ्या घेऊन पोबारा केला. राहाता शहरातील नगर-मनमाड रोडवरील साई दर्शन कॉम्प्लेक्समधील एका गिफ्ट गॅलरीत ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल बुधवारी दुपारच्या वेळी साधूचा वेश धारण केलेले दोन तरुण साई दर्शन कॉम्प्लेक्समधील गिफ्टच्या दुकानात आले. त्यावेळी दुकानात महिला दुकानदार एकटीच होती. या दोघांनी सुमारे पाच ते दहा मिनिटे तिच्याशी विविध विषयांवर बोलत तिला संभाषणात गुंतवून ठेवले. बोलता-बोलता त्यांनी महिलेला संमोहित केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तिच्या गल्ल्यातील रोख रक्कम तसेच हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेत दोन्ही चोरटे दुकानातून पसार झाले.

या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वी वारकरी वेशात आलेल्या चार तरुणांनी तालुक्यातील एकरुखे शिवारातील एका वस्तीवर सरकारी वकिलाच्या घरात प्रवेश करून महिलेवर चाकूचा धाक दाखवत सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली होती. या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साधू, वारकरी किंवा अन्य धार्मिक व्यक्तींचा वेश धारण करून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर नागरिकांनी अंधविश्वास न ठेवता सावध राहणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गस्त वाढवून कारवाईची मागणी

राहाता शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून लूटमार, चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन गस्त वाढवावी तसेच संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT