

नगर: अस्सल मराठी मातीतील देशी खेळ मानल्या जाणार्या खो-खो खेळाचा थरार नगरकर क्रीडा रसिकांना लवकरच अनुभवण्यास मिळणार आहे. तब्बल ४० वर्षांनंतर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी वरिष्ठ गट खो-खो स्पर्धा नगरला होणार आहेत. महाराष्ट्र असोसिएशनने नगरवर स्पर्धा आयोजनाची जबाबदारी दिली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सुट्यांच्या काळात या स्पर्धेच्या माध्यमातून खो-खोची नजाकत व कौशल्य नगरकर क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील तब्बल सातशेवर खेळाडू नगरला येणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
मुंबई व पुण्यानंतर अहिल्यानगरच्या खो-खो खेळाडूंचा राज्यात दबदबा आहे. खो-खो क्षेत्रातील मानाचे एकलव्य, वीर अभिमन्यू, भरत, राणी लक्ष्मीबाई, जानकी, इला यासारखे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार आणि जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही नगरच्या खो-खो खेळाडूंना मिळालेले आहेत. हा नावलौकिक मिळवणार्या अहिल्यानगरला यंदा ६२ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा व निवड चाचणी घेण्याचा मान मिळाला आहे.
याआधी १९८६ मध्ये अशी राज्य स्पर्धा नगरला झाली होती. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी पुन्हा एकदा अहिल्यानगरला हा मान मिळाला आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्य उपाध्यक्ष अशोक पितळे व राज्य सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांनी अहिल्यानगरमध्ये राज्य स्पर्धा घेण्यास मान्यता दिली आहे व तसे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अॅड. विश्वासराव आठरे पाटील व खजिनदार गौरव पितळे यांना कळवले आहे. त्यामुळे आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजनाची तयारी सुरू झाली आहे.
४८ संघ सहभागी होणार
६१ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा मागच्या वर्षी बीड येथे झाली होती. यंदाची ६२ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद वरिष्ठ गट खो-खो स्पर्धा व निवड चाचणी नगरला होणार आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांचे २४ पुरुष व २४ महिला असे ४८ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या संघांचे मिळून सातशेवर खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, स्पर्धा पंच, क्रीडाधिकारी मिळून सुमारे एक हजार जण यानिमित्ताने अहिल्यानगरला येणार आहेत.
राज्याचे संघ निवडणार
अहिल्यानगरला पाच दिवस होणार्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत सहभागी राज्यभरातील खेळाडूंमधून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचे पुरुष व महिला असे दोन संघ निवडले जाणार आहेत. हे दोन्ही संघ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.