

शशिकांत पवार
नगर तालुका: जलस्रोत कोरडे, पिके तहानलेली, फुलोऱ्यात असलेल्या पिकांची गळणारी फुले अन् आभाळाकडे लागलेल्या बळिराजाच्या नजरा अशी विदारक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
पावसाअभावी बहरात आलेल्या खरीप हंगामातील पिकांना मोठा पाण्याचा ताण बसला असून, फुलोऱ्यात आलेल्या पिकांची फुले गळू लागली आहेत. शेतात उमललेली फुले गळताना केवळ उत्पादनाची आशाच नाही, तर बळिराजाने पाहिलेली स्वप्नेही डोळ्यांसमोर गळून पडत असल्याचे हृदयद्रावक चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील बहुतांशी जलस्रोत कोरडेठाक असून, पिण्याचे पाणी व चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे.
पेरणीच्या सुरुवातीपासूनच पावसाने लपंडाव सुरू केल्याने तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, तसेच चारा पिकांची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांनी उभारी घेतली. सोयाबीन, मुगाला फुलोरा आला आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. फुलोऱ्यात आलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पाऊसच गायब झाल्याने फुले गळून पडत आहेत.
पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पाने सुकू लागली असून, फुलोरा टिकविण्यासाठी आवश्यक असलेला ओलावा जमिनीत राहिलेला नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने, खर्च करून आणि उधारी-उसनवारी करून उभी केलेली पिके आता डोळ्यांसमोर कोमेजताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले, तरी तालुक्यातील तलाव, बंधारे, नाले आणि नदीपात्रांमध्ये अद्याप पाण्याचा स्पर्शच झाला नाही. सीना, शुढळा, केळ, खारोळी यांसह बहुतांश नद्या कोरड्याच असून, लहान-मोठे जलसाठेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑगस्ट संपत आला, तरी १९ गावांना अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यातही गावांची तहान टँकरवर भागवावी लागत असल्याने भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे. दमदार पावसाअभावी आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह पशुधन, चाऱ्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन, बाजरी, तूर यांसह चारा पिकांनाही पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामच अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. खरीपच संकटात सापडल्याने रब्बीच्या आशाही मावळत चालल्या आहेत. त्यामुळे बळिराजाला मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदा शेतात पिकापेक्षा चिंताच जास्त उगवली आहे. पेरणीपासूनच पावसाअभावी खरीप पिकांची हेळसांड झाली आहे. कर्ज काढून केलेली पेरणी अन् पिकांची झालेली दयनीय अवस्था शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.
देविदास कासार, शेतकरी, वाळकी
पेरणी करताना डोळ्यांसमोर हिरवंगार शिवाराचं स्वप्न होतं. त्याच शिवारात पिकं कोमेजताना पाहून काळजात कालवाकालव होते. वरुणराजाने कृपा करावी. पावसाअभावी बळिराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे.
विकास म्हस्के, शेतकरी, जेऊर