CCTV Camera Pudhari
अहिल्यानगर

Rahata Jalgaon CCTV: राहाता तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम उलटले; ग्रामस्थ नाराज

आठ-नऊ महिन्यांपासून काम रखडले; सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली

पुढारी वृत्तसेवा

पुणतांबा: राहाता तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम तब्बल आठ-नऊ महिन्यांपासून रखडले आहे. विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर होऊनही प्रत्यक्षात कॅमेरे बसवले गेले नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असून गावाची सुरक्षा सध्या ‌‘रामभरोसे‌’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जळगाव येथे यापूर्वी वादाच्या काही घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामपंचायतीत दि.21 जुलै 2025 रोजी विशेष ग्रामसभा घेऊन गावात शेकडो ग्रामस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आग्रही मागणी केली होती. 2025-26 वर्षाच्या आराखड्यात काम घेण्यात आले होते. 15 व्या वित्तआयोगाच्या निधीतून संबंधित काम होणार होते. हे काम वेळेत होणे अपेक्षित होते. सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हा विषय कोरममध्ये घेऊन सभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.

शासनाकडून मिळणाऱ्या 15 व्या वित्तआयोगाच्या निधीतून हे काम तत्काळ करण्यात येईल, असे त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले होते. मात्र गावात इतर कामांना प्राधान्य दिले गेले, पण अतिगरजेच्या या कामाला अंदाजे आठ-नऊ महिने उलटूनही मुहूर्त सापडला नाही. स्थानिकांकडून या प्रकरणाची विचारणा सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव-एलमवाडी परिसर मोठा असून प्रमुख ठिकाणी ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग होणारे अद्यावत कॅमेरे बसविणे काळाची गरज आहे. याचे निरीक्षण थेट ग्रामपंचायत कार्यालयातून होणे आवश्यक आहे.

याठिकाणी कॅमरे बसवा

गावातील धार्मिक स्थळे, शासकीय कार्यालये, स्मशानभूमी, मंगल कार्यालय, पाणी साठवण तलाव, मुख्य चौक, प्रमुख रस्ते, शाळा व अंगणवाडी परिसर येथे कॅमेरे बसविण्याची गरज आहे. तसेच सरकारी दवाखाना, वॉटर एटीएम, पाण्याच्या टाक्या, विहिरी तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणीही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जळगाव- सीसीटिव्हीचा आराखड्यात समावेश आहे. या कामासाठी चालू वर्षी जानेवारी महिन्यात निधी प्राप्त झाला आहे. अंदाजित 3 लाखांचा निधी खर्च होणार आहे. मात्र मागील फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायतीवर प्रशासकराज लागू झाल्याने गावठाणातील कॅमेरे बसविण्याचे काम सध्या थांबले आहे.
सतीश दिघे, ग्रामपंचायत अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT