नगर: अतिवृष्टी आणि आतापर्यंत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांची पेरणी रखडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नवीन उसासह 17 टक्के म्हणजे 91 हजार 975 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये 57 हजार 182 हेक्टर क्षेत्रावरील अन्नधान्य पिकांचा समावेश आहे. ज्वारीचा पेरा 40 हजार 251 तर हरभरा 8 हजार 101 हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. गहू पेरणीस म्हणावा असा वेग आला नसून, आतापर्यंत 3 हजार 240 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा रब्बी हंगाम दीड-दोन महिने लांबणार असल्याची शक्यता आहे. (Latest Ahilyanagar News)
पावसाळ्यातील पहिले साडेतीन महिने तुटीचा पाऊस झाला. अशा परिस्थितीत खरीप पिकांची पेरणी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाली. सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या पंधरा दिवसांत अतिवृष्टीने हाहाकार केला. अवघ्या पंधरा दिवसांत 307 मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने जिल्हाभरातील तब्बल सव्वासहा लाख हेक्टर खरीप पिके मातीमोल करीत शेतशिवारात पाणीच पाणी केले. या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी पेरासाठी शेतकऱ्यांना वापसाच मिळाला नाही. त्यामुळे पेरणीचा कालावधी संपला आहे.
पावसाळ्यानंतर अवकाळी पावसाने जोर धरला. अद्याप अवकाळी सुरुच आहे. त्यामुळे रब्बीसाठी मशागत झाली नाही. परिणामी पेरणी रखडली. ज्वारी पेरणीचा कालावधी संपल्यामुळे हरबरा, मका व गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यंदा धरणांत मुबलक पाणीसाठा तसेच भूजलपातळी समाधानकारक असल्याने रब्बी हंगामी पिकांसाठी अनुकूल वातावरण असताना अवकाळी पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अगोदरच खरीप वाया गेल्याने बेजार झालेला शेतकरी आणखीणच खचला आहे.
यंदा रब्बी पिकांसाठी 5 लाख 44 हजार 361 हेक्टर क्षेत्र निश्चित केले. यामध्ये 4 लाख 48 हजार 967 हेक्टर क्षेत्र अन्नधान्यासाठी असणार आहे. आतापर्यंत सरासरी 16.90 टक्के म्हणजे उसासह 91 हजार 975 हेक्टरवर पेरा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 24 टक्के ज्वारी, 35 टक्के ऊस तर 6.67 टक्के हरबरा व 9.37 टक्के मक्याचा समावेश आहे.
पिके आणि पेरणी
ज्वारी : नगर -14462, पारनेर-10961, जामखेड - 4525, श्रीरामपूर- 24, राहाता -15.
गहू : संगमनेर -1410, अकोले -486, नेवासा - 407, श्रीगोंदा-109, नगर - 68, श्रीरामपूर -285.
हरभरा : नगर-1964, पाथर्डी-3150, संगमनेर-746, अकोले -290, शेवगाव -230.
मका : कर्जत- 2352, संगमनेर : 820, श्रीगोंदा-985,पारनेर-386, श्रीरामपूर -273. (हेक्टर)