टाकळीभान : खरीप हंगामात पावसामुळे झालेले नुकसान, मातीत गेलेले कष्ट व वाया गेलेला खर्च, याचे दुःख बाजूला करीत शेतकरी पुन्हा नव्या उत्साहाने व उमेदीने रब्बीसाठी ताठ मानेने उभा ठाकला आहे. टाकळीभानसह तालुक्यात शेतकरीवर्ग रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेती मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
टाकळीभानसह परिसरातील खोकर, भोकर, कारेगाव, भेर्डापूर, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, मालपूर, माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर, भामाठाण आदि परीसरात रब्बी हंगामासाठी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
मशागतीसाठी परंपरागत बैलजोडीची जागा आता यांत्रिकीकरणाने घेतली असून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागतीची कामे सुरू आहे. सोयाबीन काढणी झालेल्या शेताची मशागत सुरू आहे. कपाशी पिक अंतिम टप्प्यात असून कापसाची शेवटची वेचणी सुरू आहे. गळीत हंगामाला सुरूवात झाली असून ऊस तोडणीला वेग आला आहे.
रब्बी हंगामात कांदा, गहु, ऊस, उन्हाळी मका, लसुण आदि पिकांची लागवड करण्यासाठी जमीन तयार करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासुन थंडीमधे वाढ झाली आहे. या थंडीचा रब्बीतील पिकांना मोठा फायदा होतो. त्यामुळे पेरणीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. यावेळी तरी रब्बी हंगामात चांगले उत्पन्न होईल व खरीपाचे झालेले नुकसान भरुन निघेल या अपेक्षेने शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे.
अवेळी पडणारा पाऊस, निसर्गाची न मिळणारी साथ व हाती आलेल्या शेतमालाला मिळत नसलेला चांगला दर अशा संकटांशी शेतकरी लढत असतांनाच दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे. प्रतिबॅग 200 ते 300 रुपयांनी रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे.