Hospital Pharmacy Medicine Purchase Rules Pudhari
अहिल्यानगर

Hospital Pharmacy Medicine Purchase Rules: खासगी रुग्णालयांची औषधांवरील सक्ती बंद! आता रुग्णांना कोणत्याही मेडिकलमधून औषधे खरेदीचा अधिकार

अन्न व औषध प्रशासनाचा कडक आदेश; रुग्णालयांत सूचना फलक बंधनकारक, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नगर: काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना केवळ रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारींनंतर, आता अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नगरचे सहाय्यक आयुक्त (औषधे) जा. हू. शेख यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला पत्र देत रुग्णांना रुग्णालयातील औषध दुकानातूनच औषधे घेण्याची सक्ती करता येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयांमध्येही तसे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सुमारे ४०० पेक्षा अधिक मोठे रुग्णालये आहेत. यातील काही ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी दिलेली औषधे ही तेथील औषधालयातूनच घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाहेरून औषधे आणता येणार नाहीत, येथीलच घ्यावे लागतील, असा दबाव आणला जात आहे. याशिवाय बाहेरून आणलेल्या औषधांबाबत आम्ही जबाबदारी घेणार नाही, अशी भीतीही दाखवली जात असल्याचे काही रुग्णांकडून समजते.

दरम्यान, राज्यभरातच अशाप्रकारे रुग्णांची लूट सुरू असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या लक्षात आली. त्यांनी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत आदेश काढून, मनमानी करणाऱ्या ‘त्या’ खासगी रुग्णालयांना चाप बसवला आहे. या आदेशानुसार, रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना परवानाधारक कोणत्याही औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. रुग्णालयांनी स्वतःच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याचा दबाव टाकू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये तपासणीदरम्यान अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे आता सर्व रुग्णालयांमध्ये या आदेशाची माहिती दर्शनी भागात लावण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.. या आदेशामुळे रुग्णांना कमी दरात औषधे उपलब्ध होण्यास मदत होणार असून, रुग्णालयांच्या औषध विक्रीतील मनमानीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आयुक्तांच्या सुचनांनुसार आम्ही स्वतः रुग्णालयांना भेटी देऊन त्या ठिकाणी औषध खरेदीबाबतच्या आवश्यक सूचना केलेले फलक लावले आहेत का, याबाबत शहानिशा करत आहोत. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई अटळ आहे.
जा. हू. शेख, सहायक आयुक्त, औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT