Pravara River Illegal Sand Mining Pudhari
अहिल्यानगर

Pravara River Illegal Sand Mining: प्रवरा नदीत अवैध वाळूउपसा; पोलिसांची धडक कारवाई, 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी पोलिसांच्या छाप्यात जेसीबी, ट्रॅक्टर व डंपरसह सात जण ताब्यात; वाळू माफियांना मोठा धक्का

पुढारी वृत्तसेवा

कोल्हार / सोनगाव: प्रवरा नदीपात्रातील वाढत्या अवैध वाळूउपशाला आळा घालण्यासाठी लोणी पोलिसांनी मंगळवारी पहाटे केलेल्या धडक कारवाईत वाळू माफियांच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे. राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक परिसरात बेकायदेशीर वाळू उत्खननावर पोलिसांनी छापा टाकून जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर आणि वाळूसह तब्बल ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेच्या शांततेत सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाच्या हालचालींबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणीचे पोलिस पथक तातडीने प्रवरा नदीपात्रात दाखल झाले. नदीपात्रात कोणतीही वैध शासकीय परवानगी न घेता यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांना पकडले.

या प्रकरणात मिनिनाथ संजय घोलप (रा. पाथरे बुद्रुक), संकेत संतोष शिरसाठ, राहुल दत्तात्रय दिघे, जयेश शिवप्रसाद पांडे, सार्थक दत्तात्रय हुलवन, विशाल संजय पिंपळे इतर एक या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांकडून वाळू उपशासाठी कोणतीही अधिकृत परवानगी सादर करण्यात आलेली नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे आणि नैसर्गिक संसाधनांच्या लुटीविरोधात लोणी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस हवालदार रवींद्र मेढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

फक्त महसुली तोटा नव्हे, पर्यावरणालाही मोठा धोका

प्रवरा नदीपात्रातील अनियंत्रित वाळू उत्खनन हा केवळ शासकीय महसुलाचा प्रश्न नसून पर्यावरणीय संतुलन बिघडवणारा गंभीर विषय मानला जातो. नदीपात्रातील सातत्याने होणाऱ्या उत्खननामुळे भूजल पातळी खालावणे, नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलणे, शेती आणि जैवविविधतेवर परिणाम होणे यांसारखे दूरगामी परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लोणी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत होत असून नदीपात्रांचे संरक्षण आणि अवैध उत्खननाविरोधात कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याची मागणी पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT