श्रीरामपूर: निळवंडे धरण ते ओझर बंधारा दरम्यान प्रवरा नदीपात्रात उभारण्यात आलेले किमान १९ अनधिकृत प्रोफाइल वॉल्स तातडीने हटवावेत, नदीपात्रातील विहिरी बुजवून उपसा सिंचन योजना बंद कराव्यात, अशी मागणी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, येत्या आठवड्यांत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास दिवाळीच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
दि. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेनंतर समितीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. प्रवरा नदी ही अधिसूचित कालवा असल्याने त्यातील पाणी अडविणारे बंधारे अनधिकृत आहेत. या बंधाऱ्यांमुळे भंडारदरा धरणाच्या सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
त्यामुळेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे बंधारे हटविण्याचे आदेश दिला होता, असा दावा समितीने केला आहे. समितीचे अध्यक्ष सुरेश ताकेपाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिकांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.
..तर दोन टीएमसी पाण्याची बचत होईल!
दि. १ डिसेंबरच्या सिंचन आवर्तनापूर्वी अडथळे हटविल्यास दोन आवर्तनात सुमारे दोन टीएमसी पाणी वाचून पिण्याच्या पाण्याची सहा आवर्तने देता येतील, असा समितीचा दावा आहे. तसेच गावांची तळी दोनदा भरून देणे, सिंचन थकबाकी माफ करणे आणि पाणी मागणी व शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.