Pratibimb Film Festival Pudhari
अहिल्यानगर

Pratibimb Film Festival: न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये 19वा ‘प्रतिबिंब’ चित्रपट महोत्सव; ‘युद्ध की शांतता’ विषयावर चित्रपटांची मेजवानी

15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान चित्रपट, राष्ट्रीय लघुपट स्पर्धा आणि ‘नैसर्गिक आपत्ती’ विषयावरील छायाचित्र प्रदर्शन; ‘मदार’चा खास शोही आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील न्यू आर्ट्‌‍स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये रविवारपासून (दि. 15) 19वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव भरविण्यात येत असून, त्यात यंदा ‌‘युद्ध की शांतता‌’ या विषयावर आधारित विविध चित्रपटांची पर्वणी रसिक प्रेक्षकांना साधता येणार आहे. संज्ञापन अभ्यास विभाग तथा डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीजतर्फे राजर्षी शाहू सभागृहात 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धाही होणार आहे. सर्व चित्रपट, लघुपट आणि माहितीपट सर्वांना विनामूल्य पाहता येतील, तसेच यंदा ‌‘नैसर्गिक आपत्ती‌’ या विषयावर प्रतिबिंब फोटो फेस्टिव्हलही भरविल्याची माहिती प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी दिली.

कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीजतर्फे सन 2007 पासून म्हणजे विभागाच्या स्थापनेपासून दर वर्षी प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. कोविड काळातही त्यात खंड न पडता हा महोत्सव ऑनलाईन पार पडला. दर वर्षी एक विषय ठरवून त्यावर आधारित उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट या महोत्सवात दाखवले जातात. यंदा ‌‘युद्ध की शांतता‌’ या विषयावरील चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यात ‌‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट‌’, ‌‘फ्लो‌’, ‌‘वी वर सोल्जर्स‌’, ‌‘जोजो रॅबिट‌’, ‌‘द मॉन्युमेंट्स मेन‌’ आणि ‌‘फॉर सामा‌’ हे चित्रपट रविवारी (15) व सोमवारी (16) सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दाखविण्यात येतील. सुरुवात ‌‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट‌’ या चित्रपटापासून होत असून, हा चित्रपट पहिल्या महायुद्धातील तरुण सैनिकांच्या मानसिकतेवर आणि त्यांना भोगाव्या लागणाऱ्या अमानुष वास्तवावर प्रकाश टाकतो. त्यानंतर ‌‘फ्लो‌’ हा संवादविरहित ॲनिमेशन चित्रपट दाखवण्यात येईल. हा चित्रपट निसर्ग, प्राणी आणि अस्तित्व यांमधील नातेसंबंध प्रभावी दृश्यात्मक मांडणीतून उलगडतो.

‘वी वर सोल्जर्स‌’ हा व्हिएतनाम युद्धावर आधारित चित्रपट सैनिकांचे शौर्य, त्याग आणि मानवी भावनांचे वास्तववादी चित्रण करतो. ‌‘जोजो रॅबिट‌’ हा चित्रपट महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एका लहान मुलाच्या नजरेतून प्रचार आणि माणुसकी यांचा संघर्ष हृदयस्पर्शीरित्या मांडतो. ‌‘द मॉन्युमेंट्स मेन‌’ या चित्रपटात युद्धकाळात युरोपमधील अमूल्य कलाकृती जतन करण्यासाठी धडपडणाऱ्या सैनिकांची कथा पाहायला मिळते. युद्धग्रस्त सीरियातील एका आईच्या दृष्टिकोनातून वास्तव मांडणारा ‌‘फॉर सामा‌’ हा माहितीपट युद्धाचे मानवी आयुष्यावर होणारे परिणाम, वेदना आणि आशा या सगळ्यांचे प्रभावी दर्शन घडवतो. हे चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे व आपल्या जगण्याचा विचार करायला लावणारे आहेत.

मंगळवारी (दि. 17) सकाळी 9 वाजता राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धेला सुरुवात होईल. रात्री सुमारे 9 वाजेपर्यंत चित्रपटप्रेमींना विद्यार्थी व खुल्या अशा दोन्ही गटांतील लघुपट व माहितीपट पाहता येणार आहेत. बुधवारी (दि.18) सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत उर्वरित खुल्या गटातील लघुपट दाखवण्यात येतील. त्यानंतर दुपारी एक वाजता परीक्षण केलेल्या लघुपट व माहितीपटांविषयी परीक्षक मुक्त चर्चा करणार आहेत. दुपारी 4 वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ पार पडणार असून त्यानंतर पुरस्कारप्राप्त लघुपट व माहितीपट पुन्हा दाखवण्यात येतील. छायाचित्रे, लघुपट, माहितीपट आणि चित्रपट ही केवळ मनोरंजनाची साधने नसून अभिव्यक्त होण्याची सशक्त माध्यमे आहेत. त्याबाबत जागरूकता वाढावी, या उद्देशाने भरवला जाणारा हा प्रतिबिंब महोत्सव सर्वांनी पाहावा, असे आवाहन संज्ञापन अभ्यास विभागातर्फे करण्यात आले आहे.

‌‘नैसर्गिक आपत्ती‌’ विषयावर छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन

प्रतिबिंब छायाचित्र महोत्सवातील प्रदर्शन व राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धाही यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे. स्पर्धेसाठी देशभरातून आलेल्या ‌‘नैसर्गिक आपत्ती‌’ या विषयावरील छायाचित्रांसह विविध छायाचित्रांचे प्रदर्शन 15 ते 18 फेब्रुवारी यादरम्यान भरविण्यात येणार असून तेही सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

‌‘मदार‌’चा खास शो

या वर्षी विशेष आकर्षण म्हणजे विभागाचे माजी विद्यार्थी मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‌‘मदार‌’ ह्या चित्रपटाचा खास शो विभागाने आयोजित केला आहे. कान फेस्टिवल, तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह ‌‘मदार‌’ला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे निर्माते व अभिनेते मिलिंद शिंदे या वेळी खास उपस्थित राहणार आहेत. चित्रपटानंतर निर्माता व दिग्दर्शकांशी प्रेक्षकांची मुक्त चर्चा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT