Pune Police Suspension Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Suspension: व्हायरल व्हिडिओ प्रकरणी लोकप्रतिनिधीचे दोन अंगरक्षक पोलिस निलंबित

शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर; पोलिस अधीक्षक घार्गेंची तातडीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नगर: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकप्रतिनिधीचे अंगरक्षक असलेल्या दोन पोलिस अंमलदारांना कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत आदेश काढले.

नीलेश भालसिंग व राघवेंद्र भालसिंग अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही पोलिसांवर कर्तव्याचे ठिकाण सोडून बोल्हेगाव परिसरात जाणे, स्वतःजवळील सरकारी रिव्हॉल्व्हर चुकीच्या पद्धतीने व हलगर्जीपणाने हाताळल्याचा, तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण असताना अशा प्रकारे शस्त्राचा गैरवापर किंवा निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाजमाध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाच्या हातामध्ये रिव्हॉल्व्हर स्पष्टपणे दिसत असून, तो महापालिका निवडणुकीच्या उमेदवाराच्या घरासमोर असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

या प्रकरणाची दखल घेत खासदार नीलेश लंके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 6) पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने रिव्हॉल्व्हरचा वापर होत असल्याचा आरोप करून संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाईची मागणी त्यांनी केली होती.

या भेटीनंतर व व्हिडीओमधील दृश्यांच्या आधारे प्राथमिक चौकशी करून पोलिस अधीक्षक घार्गे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. लोकप्रतिनिधीचे अंगरक्षक म्हणून नेमणूक असलेले आणि व्हिडीओमध्ये दिसून येणारे पोलिस अंमलदार नीलेश भालसिंग व राघवेंद्र भालसिंग यांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT