चिचोंडी शिराळ: पाथर्डी-नगर-राहुरी तालुक्यातील सुमारे 45 गावांमधील 102 पाझर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाथर्डी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.
यंदा पाथर्डी, नगर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात व फेब्रुवारी, मार्च, मे व जूनमध्ये बहुतांशी भागांमध्ये कितीही पाऊस झाला, तरी पाण्याचा तुटवडा भासत असतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत असतो. भयाण पाणीटंचाईला या भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असते. रब्बी हंगामात यावर्षी उशिरा पेरणी झाल्याने जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्ये शेतकऱ्यांना पिके वाऱ्यावर सोडावी लागणार नाही याची आत्ताच काळजी घेतली तर पाणी वेळेत येईल.
मुळा धरण आता जवळपास 85 टक्के भरलेले असून, धरणातून वांबोरी जलवाहिनी योजनेसाठी तत्काळ पाणी सोडण्यात यावे. जेणेकरून या पाण्यामुळे लाभधारक पाझर तलावात पाणी येऊन शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी मार्गी लागेल. मुळा पाटबंधारे विभागाने वांबोरी चारीला पाणी सोडावे, या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांत लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली जाणार आहे.
मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी न सोडल्यास लाभधारक शेतकरी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा चेअरमन संतोषराव गरुड, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे उपाध्यक्ष भीमराज सोनवणे, युवानेते राजेंद्र दगडखैर, चेअरमन पोपटराव आव्हाड, विष्णू गंडाळ, राजेंद्र गीते, विजय पालवे, सुखदेव गीते, भास्कर अटकर, भगवान फुलमाळी, विलास टेमकर, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, सोसायटीचे संचालक राजेंद्र आंधळे यांनी केली आहे.
पाथर्डी, नगर, नेवासा तालुक्यातील 45 गावांना जलसंजीवनी समजली जाणारी वांबोरी चारीच्या माध्यमातून 102 तलाव भरण्याचे नियोजन असते. तीन महिन्यांपूर्वी उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले तर वांबोरी चारीतील शेतकऱ्यांचे हक्काचे 680 एमसीएफटी पाणी वांबोरी चारीतून जानेवारीमध्ये सुरू केले तर या भागाला वेळेत पाणी मिळू शकते. शंभर दिवसांसाठी आवर्तन करण्यात येत असते. सुरुवातीचे काही दिवस पंप दुरुस्ती करण्यात जातात. त्यानंतर खऱ्या अर्थाने या भागाला पाणी मिळते. त्यामुळे वांबोरी चारी नियोजन लवकरात लवकर करून या भागाला पाणी देण्यात यावे.संतोष गरुड, सामाजिक कार्यकर्ते