पाथर्डी : पाथर्डी ते कल्याण एस.टी. बसमधील प्रवासादरम्यान पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचा मोठा ऐवज चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये शेजारी येऊन बसलेल्या अनोळखी महिलेनं संधी साधून पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची फिर्याद पाथर्डी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
अलका मुकुंद पालवे (वय 39, रा. देवराई ता. पाथर्डी, सध्या नवी मुंबई) ह्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नी असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 19 नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे 3.30 वाजता त्या पाथर्डी येथील नवीन बसस्थानकातून कल्याणकडे जाणाऱ्या एस.टी. बसने प्रस्थान केले. त्यांच्या शेजारी गोऱ्या वर्णाची, डाव्या हातावर बदाम-ओकारात बाणाचे गोंदण असलेली एक अनोळखी महिला येऊन बसली. प्रवासादरम्यान तिच्या हालचाली संशयास्पद जाणवत असतानाच तिसगाव येथे ती संशयित महिला उतरली.
काही वेळानंतर आपल्या पर्सची पाहणी करताना पालवे यांना आत ठेवलेले दागिने व रोकड गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यांनी तत्काळ कंडक्टरला याबाबत कळवून करंजी येथे उतरून खासगी वाहनाने तिसगाव बसस्थानकात शोध घेतला; मात्र ती महिला तेथे आढळून आली नाही.
चोरी गेलेल्या मुद्देमालात दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम दीड लाख रुपये यासह इतर दागिन्यांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यात दोन तोळे सोन्याचे झुंबर, पाच ग्रॅम सोन्याची कानातली, दोन तोळे मणीमंगळसूत्र, दोन तोळ्यांचे दोन पळ्यांचे मणीमंगळसूत्र, तीन तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रॅमचे छोटे मणीमंगळसूत्र व रोख रक्कम 1.50 लाख असा मोठ्या किंमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.