पाथर्डी: शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये दरमहा 17 टक्के परतावा देण्याचे तसेच सहा महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील दोन व्यक्तींनी हातगाव (ता. शेवगाव) येथील शेतकरी व ग्रामस्थांची तब्बल 12 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात सुदाम आबासाहेब मुखेकर व नय्युम हसनभाई बागवान (दोघे रा. कोरडगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुराद समसुद्दीन पठाण (वय 54) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील कोरडगाव येथील सुदाम आबासाहेब मुखेकर व नय्युम हसनभाई बागवान यांनी ऑक्टोबर 2023 पासून ‘शिवराज ट्रेडर्स’ या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग ऑफिस सुरू केल्याचे सांगून गुंतवणुकीस प्रवृत्त केले.
दरमहा 17 टक्के परतावा व सहा महिन्यांत पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत, अनेकांनी गुंतवणूक केल्याचे भासवून त्यांनी अनेकांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादी पठाण यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीस काही रकमेचा परतावा देण्यात आला; मात्र त्यानंतर परतावा थांबवण्यात आला.
पैसे मागितल्यावर आमच्याकडे पैसे नाहीत असे सांगून टाळाटाळ करण्यात आली. तसेच पैसे मागितल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने गुंतवणूकदार भयभीत झाले. या दोघांनी आणखी नागरिकांचीही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
फसवणूक झालेल्या नागरिकांची नावे अशी:
मुराद पठाण, अशोक चंग, सचिन कुलकर्णी, सत्यनारायण मिसाळ, आसाराम दिवटे, सलमान सय्यद, ब्रह्मानंद मिसाळ, रसुलभाई शेख, रमेश खोलासे (सर्व रा. हातगाव ता. शेवगाव) पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव तपास करीत आहेत.