Pathardi Road Protest Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Road Protest: पाथर्डीत रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात संतप्त ग्रामस्थांचा बैठा सत्याग्रह

अकोला–मोहोजदेवढे–जांभळी रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अपूर्ण, नागरिकांच्या जीवितास धोका

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: अकोला, मोहोजदेवढे ते जांभळी या तीन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असतानाही अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वारंवार दिलेली मुदत संपूनही ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तब्बल दोन तास बैठा सत्याग्रह केला.

आंदोलनात जांभळीचे सरपंच विजय आव्हाड, अकोल्याचे माजी सरपंच नारायण पालवे, मोहोजदेवढेचे माजी सरपंच पंडितदादा देवढे, तसेच आजीनाथ देवढे, महादेव गर्जे, पंढरीनाथ कांजवणे, लक्ष्मण दातीर, शंकर केकाण, रणजित थोरात, भाऊसाहेब पालवे, दत्ताभाऊ दातीर, ज्ञानेश्वर गर्जे, हरिभाऊ दातीर, अंबादास कु-हाडे, सुनील ओव्हळ, पत्र्याच्या तांड्याचे सरपंच गणेश पवार, पत्रकार राजेंद्र सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

या रस्त्याच्या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी आमदार मोनिका राजळे यांनी उपलब्ध करून दिला आहे. सदर काम शेवगाव येथील ठेकेदार उदय मुंढे यांना देण्यात आला आहे. मात्र, अकोला गावाच्या हद्दीत केवळ थोड्याशा भागाचे काँक्रीटीकरण व काही खड्ड्यांवर डांबर टाकले असून, उर्वरित रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे.

रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला 59 लाख रुपयांचे बिल अदा केले असतानाही उर्वरित काम ठेकेदार करण्यास तयार नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.या प्रश्नाबाबत अकोला, मोहोजदेवढे व जांभळी या तिन्ही गावांच्या ग्रामपंचायतींनी यापूर्वी लेखी पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनस्थळी उपविभागीय अधिकारी राहुल कांबळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून, ठेकेदाराची मुदत संपल्याने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगितले. तीन दिवसांत काम सुरू केले जाईल, अन्यथा संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

वाढीव बिल मंजूर करू नका

अकोला ते मोहोजदेवढे रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी मंजूर होऊन ठेकेदार उदय मुंढे यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. एक वर्षांची मुदत गेल्या 15 मार्चला संपली असूनही 11 महिने उलटून काम अपूर्ण आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने काम परवडत नसल्याचे कारण देत ठेकेदाराने वाढीव बिलाची मागणी केल्याचा आरोप आहे. वेळेत काम झाले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती, त्यामुळे वाढीव बिल मंजूर करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यास ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT