अमोल कांकरिया
पाथर्डी: जिद्द, दूरदृष्टी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीवरील निस्सीम प्रेम यांच्या बळावर सरकारी नोकरी सांभाळत शेतीत यशाचे शिखर गाठणारे माळी बाभुळगाव (ता. पाथर्डी) येथील चंद्रशेखर वायकर हे आज परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. पंचायत समिती पाथर्डीमध्ये कनिष्ठ लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गेल्या २२ वर्षांत टप्प्याटप्प्याने वडिलोपार्जित ३५ एकर शेती पूर्णतः बागायती करून आधुनिक कृषी व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे.
वायकर वस्तीवरील ३५ एकर शेती संपूर्णपणे बंदिस्त करण्यात आली आहे. त्यामुळे रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यात त्यांना यश मिळाले आहे. या क्षेत्रापैकी २५ एकरांवर आंब्याची बाग, सात एकरांवर डाळिंबाची बाग आणि उर्वरित क्षेत्रात गहू, बाजरी व जनावरांसाठी चारा पिकवला जातो. शेतीसोबतच सुमारे १५ जनावरांचे संगोपनही केले जाते.
सुमारे वीस वर्षांपूर्वी त्यांनी १२०० आंब्याची रोपे लावली. नंतर गुजरातमधून चार हजार रोपे आणून लागवड केली. २०२३ मध्ये अडीच हजार आणि २०२४ मध्ये आणखी १५०० आंब्यांची लागवड केली. आज २५ एकर क्षेत्रात सव्वापाच हजारांहून अधिक एकेश्वर वाणाच्या आंब्याची झाडे जोमाने वाढत आहेत. त्यापैकी अडीच हजार झाडे इस्रायली पद्धतीने विकसित केली आहेत. आंबा विक्रीतून दर वर्षी सुमारे ४० लाख रुपयांची उलाढाल होते. सात एकरांतील डाळिंब बागेतून सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. फळबागांच्या यशामागे जलव्यवस्थापनाची भक्कम बाजू आहे. सव्वा एकर क्षेत्रात तब्बल तीन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे केले असून सर्व बागेला ठिबक सिंचन केले जाते. ठिबक सिंचन पाईपांना खार, ससे, उंदीर आणि इतर प्राण्यांमुळे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी २२ मांजरे पाळली आहेत.
फळबागेचे व्यवस्थापन, फवारणी, खत नियोजन, पाणीपुरवठा आणि देखभालीसाठी दहा कामगार कायमस्वरूपी कार्यरत आहेत. त्याद्वारे शेतीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केले जाते. सेंद्रिय शेतीवर भर देत शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नोकरीचा व्याप सांभाळूनही चंद्रशेखर वायकर पहाटे आणि रात्री स्वतः शेतात सर्व बाबींवर लक्ष ठेवतात. त्यांच्या या प्रवासात पत्नी अनिता यांची मोलाची साथ लाभली. त्याच पूर्णवेळ शेतीकडे लक्ष देऊन बागेच्या देखभालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे वायकर सांगतात. वायकर यांचा मुलगा आकाश यूपीएससीची तयारी करत असून, त्याला कुत्रेपालनाचा छंद आहे.
‘श्रीनाथ फार्म’ या ऑनलाइन माध्यमातून तो युरोपियन डॉबरमॅन या कुत्र्यांचे प्रजनन व विक्री करतो. या व्यवसायातून त्याला दर वर्षी सुमारे ३० लाखांचे उत्पन्न मिळते. गेल्या फेब्रुवारीमध्ये देशातील १६ राज्यांमध्ये प्रवास करून त्याने २५ डॉबरमॅन पिल्लांचे वितरण केले. या कुत्र्यांसाठी खाद्यपदार्थही तो स्वतः तयार करतो. वायकर यांच्या शेतीला लागून वनविभागाचे क्षेत्र आहे. तेथे उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. शेती हा केवळ व्यवसाय नसून एक ध्यास असल्याचे चंद्रशेखर वायकर यांच्या कार्यातून दिसून येते. शेतीकडे उद्योग म्हणून पाहिल्यास यश निश्चित मिळू शकते, याचा वस्तुपाठच वायकर कुटुंबाने घालून दिला आहे. त्यांची ही यशोगाथा ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.