अमोल कांकरिया
पाथर्डी : पंचायत समितीच्या इतिहासात स्थापनेपासून पहिल्यांदाच अनुसूचित जातीच्या महिलेला तालुक्याच्या सभापतिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळणार असल्याने त्या पदासाठी इच्छुक असलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. पाथर्डी तालुका सभापतिपदासाठी अनुसूचित जाती महिला हे आरक्षण निघाले आहे.(Latest Ahilyanagar News)
मिनी आमदारकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्याच्या इतिहासात सभापतिपदावर पहिल्यांदाच अनुसूचित जातीच्या महिलेला संधी मिळणार असल्याने जे गुडघ्याला बाशिंग बांधून तालुक्याचे राजकारण करणार होते. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला.
बऱ्याच वर्षांपासून निवडणुका न झाल्याने गावपातळीवरील पुढारी जोमात आहेत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टीने अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. अजूनपर्यंत गणाचे आरक्षण पडले नसल्याने सध्या सर्वजण गुळणी धरून आहेत. एकदा गणाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यात वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण आहेत. सभापतिपदासाठी रवींद्र आरोळे, काकासाहेब शिंदे, भगवान साठे, महेश अंगारखे, सुनील परदेशी, ज्ञानदेव केळगंद्रे, दिगंबर गाडे, बाबा राजगुरू, वसंत बोर्डे, महेंद्र राजगुरू आदींच्या सौभाग्यवती रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशीच पारंपरिक लढत होणार आहे.
आ. गर्जे व ढाकणे यांच्या भूमिककडे लक्ष
विधानपरिषदेचे सदस्य असलेले आ. शिवाजीराव गर्जे यांची भाजपबरोबर युती होणार की वेगवेगळे लढणार याचीच चर्चा जोरात चालू आहे. भाजपकडे सर्वात जास्त इच्छुक असल्याने आ. मोनिका राजळे यांचा तिकीट वाटताना कस लागणार आहे. विरोधी महाविकास आघाडीचे नेतृत्व खा. निलेश लंके करणार आहेत. त्या दृष्टीने त्यांनी तालुक्यात मोर्चेबांधणी चालू केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांची काय भूमिका राहते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.