Pathardi Panchayat Samiti Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Panchayat Samiti: पाथर्डी पंचायत समितीचा वीजपुरवठा खंडित; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना

थकीत 65 हजारांच्या वीजबिलामुळे कामकाज ठप्प; सोलर यंत्रणा निष्क्रिय असल्याने वाढला भार

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी : पाथर्डी पंचायत समितीचे वीजबिल थकीत राहिल्याने बुधवारी (दि. 25) वीज वितरण कंपनीने थेट वीजपुरवठा खंडित केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पंचायत समितीचा संपूर्ण कारभार अक्षरशः ठप्प झाला असून, प्रशासनाच्या ढिसाळ व बेफिकीर कार्यपद्धतीचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. पंचायत समितीकडे तब्बल 65 हजारांचे वीज बिल थकीत होते. याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर वीज वितरण कंपनीने कठोर भूमिका घेत पुरवठा खंडित केला.

या घटनेचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसला. वीजपुरवठा खंडित होताच पंचायत समितीतील दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. सध्या बहुतांश प्रशासकीय कामे संगणक प्रणालीवर अवलंबून असल्याने वीज नसल्यामुळे सर्व संगणक, सर्व्हर व ऑनलाईन सेवा बंद पडल्या.

जन्म-मृत्यू नोंद, विविध दाखले, विविध योजना अर्ज, शासकीय कागदपत्रांची पडताळणी यांसारखी महत्त्वाची कामे थांबली. नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जावे लागले.

याशिवाय पंचायत समितीतील विविध विभागांमधील अंतर्गत कामकाजही थांबले. फाईल्सची देवाणघेवाण, अहवाल सादर करणे, पत्रव्यवहार, ई-मेलद्वारे होणारे संवाद या सर्व प्रक्रियांना ब्रेक लागला. अधिकारी व कर्मचाऱ्यांना अक्षरशः अंधारात बसून वेळ काढण्याची वेळ आली. कार्यालयांमध्ये अनेक पंखे, दिवे बंद असल्याने उकाडा व अस्वस्थता निर्माण झाली. या घटनेमुळे प्रशासनातील नियोजनशून्यता उघड झाली. एवढ्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात वीज बिलासारख्या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष होणे हे गंभीर मानले जात आहे.

दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर तातडीने 65 हजारांपैकी 35 हजार रुपये भरण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसभरात झालेल्या कामकाजाच्या नुकसानीची भरपाई कशी करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पंचायत समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निष्क्रिय सोलर यंत्रणेमुळे बिलात वाढ

पंचायत समितीकडे सोलर प्रणाली उपलब्ध असून, कुणीतरी खोडसाळपणे तिची जोडणी तोडल्यामुळे सोलरमधून निर्माण होणारी वीज वितरण यंत्रणेत जमा झाली नाही. त्यामुळेच वीज बिल वाढल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. अन्यथा सोलरमुळे बिल अत्यल्प येते असे सांगण्यात आले.

सोलरवर लाखो खर्च, पण उपयोग नाही

सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी प्रशासनावर तीव्र टीका करत सोलर प्रकल्पावर मोठा निधी खर्च करूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे म्हटले आहे. पंचायत समितीतील सोलर पुरवठा जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच शौचालयांची अस्वच्छता आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांपासून थकीत मानधन यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी बोट ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT