

लोणी : केंद्राच्या धर्तीवर राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या नमो किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याचे अनुदान नुकतेच वर्ग झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख 42 हजार शेतकऱ्यांसाठी 108 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारचे वर्षाला 6 हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचे 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बॅक खात्यात वर्ग होत असल्याने दोन्ही योजनांचा मोठा दिलासा मिळत आहे.
राज्य सरकारने आठव्या हप्त्याच्या अनुदानापोटी 1789 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली. त्यामुळे राज्यातील 89 लाख 75 हजार 298 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील 5 लाख 42 हजार 514 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे 108 कोटी 50 लाख रुपये जमा झाले असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने नेहमीच शेतकरी हिताचा विचार करून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
आतापर्यंत विविध योजना तसेच नैसर्गिक संकटापोटी 15 हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना झाली असून, नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देतानाच मोफत वीज तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.