Pathardi Onion Price Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Onion Price: पाथर्डी बाजार समितीत कांदा ३५०० रुपये; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

बुधवारी बाजार समितीच्या आवारात ६६४ गोणी, म्हणजेच ३३२ क्विंटल कांद्याची आवक झाली.

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डमध्ये बुधवारी (दि. १२) झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला ३५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याची बाजार समितीत चांगली आवक होत असून, गुणवत्तेनुसार विविध प्रतींच्या कांद्याला दर निश्चित करण्यात आले.

बुधवारी बाजार समितीच्या आवारात ६६४ गोणी, म्हणजेच ३३२ क्विंटल कांद्याची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला २७०० ते ३५०० रुपये, द्वितीय प्रतीच्या कांद्याला १९०० ते २७०० रुपये, तृतीय प्रतीच्या कांद्याला ११०० ते १९०० रुपये, तर चतुर्थ प्रतीच्या कांद्याला ५०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २ हजार रुपये प्रति क्विंटल राहिला.

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंद पडलेला कांदा बाजार आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेत जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

पाथर्डी बाजार समितीमध्येच व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी होत असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाजार समितीकडे आणत आहेत.कांद्याची आवक वाढत असून बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीची चांगली उलाढाल सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला गुणवत्तेनुसार योग्य भाव मिळावा, यासाठी बाजार समिती व्यापाऱ्यांशी समन्वय साधून प्रयत्न करीत आहे. बाजार समितीचे अध्यक्ष सुभाष बर्डे व उपाध्यक्ष कुंडलिक आव्हाड व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांना पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीस आणण्याचे आवाहन केले.

बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कांद्याचे दर असे :

प्रथम प्रत : २७०० ते ३५०० रुपये, द्वितीय प्रत : १९०० ते २७०० रुपये, तृतीय प्रत : ११०० ते १९०० रुपये, चतुर्थ प्रत : ५०० ते ११०० रुपये, सर्वसाधारण : २००० रुपये प्रतिक्विंटल, एकूण आवक : ६६४ गोणी ३३२ क्विंटल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT