पाथर्डी: पाथर्डी नगरपरिषद कार्यालयात उशिराने येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष अभय आव्हाड आणि मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी कार्यालयाच्या गेटवर रंगेहाथ पकडून चांगलेच सुनावले. कार्यालयीन वेळेच्या शिस्तीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना थांबवून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली.
पाथर्डी नगरपरिषदेचे नियमित कार्यालयीन कामकाज पावणे दहा वाजता सुरू होते. त्यापूर्वी शिपायांनी साडेनऊ वाजता कार्यालयात हजर राहणे अपेक्षित असते, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पावणेदहा वाजता कामकाज सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचारी नेहमीच उशिराने येत असल्याचे निदर्शनास येत होते. याची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष आव्हाड व मुख्याधिकारी लांडगे यांनी संबंधितांना वेळेवर कार्यालयात हजर राहण्याच्या सक्तीच्या सूचना दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी उशिराने येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हजेरीपटावर स्वाक्षरी करू दिली जाणार नाही. शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशाराही दिला. भाजपाची सत्ता आल्यानंतर नगरपरिषदेतील प्रशासनावर वचक बसविण्याच्या दृष्टिने आता कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सुविधा पुरविल्या जातात.
मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नागरिकांची कामे वेळेत होत नसतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष व नगरसेवकांनी प्रशासनावर कामाचा धाक ठेवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
अस्वच्छतेबाबत सुनावले
दरम्यान, नवीन नगरपरिषद इमारतीच्या देखभाल व स्वच्छतेबाबत असमाधानकारक कामकाज दिसून आल्याने संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही नगराध्यक्ष अभय आव्हाड आणि मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी चांगलेच सुनावले.