Pathardi Illegal Liquor Sale Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Illegal Liquor Sale: पाथर्डीत अवैध दारूविक्रीवर एलसीबीचा ‘पंच’; पाच ठिकाणी छापे, २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

हॉटेल आणि दुकानांमध्ये कारवाई; पाच जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २६) धडक कारवाई केली.तालुक्यातील विविध ठिकाणी पाच स्वतंत्र छापे टाकून विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या पाच जणांकडून तब्बल २९ हजार ८०५ रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे ताअवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशानुसार पोलिस पथक पाथर्डी पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार गणेश लोंढे यांना विविध ठिकाणी अवैध दारूविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. माळीबाभूळगाव रोडवरील हॉटेल रानवारा येथे सायंकाळी छापा टाकण्यात आला. यावेळी सुजन मनबीर मगर (वय २६, रा. रुकुम, नेपाळ, हल्ली रा.हॉटेल रानवारा, माळीबाबुळगाव) याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या असा ३ हजार ९० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

मगर याने आपण हॉटेलमध्ये शेफचे काम करीत असून मालकाच्या सांगण्यावरून दारू विक्री करीत असल्याचे पोलिसांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात हॉटेल मालक बाबासाहेब उत्तम शिरसाठ (रा. धामनगाव देवी) याचे नावही फिर्यादीत नमूद असून तो फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर धामणगाव देवी येथील सार्थक किराणा दुकानाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. तेथे राजेंद्र एकनाथ देशमुख (वय ५५) याच्याकडून देशी दारू, रॉयल स्टॅग व बिअर असा ५ हजार ८३५ रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

तसेच शिरसाठवाडीत हॉटेल माऊलीवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. प्रविण गणेश दराडे (वय २४) याच्याकडून देशी-विदेशी या दारूच्या बाटल्या असा ४ हजार ९०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच माणिकदौंडी येथील हॉटेल सुमित वर छापा टाकण्यात आला. शाहरुख बनेखा पठाण (वय २५) याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या असा १० हजार ७९० रुपयांचा सर्वाधिक दारूसाठा जप्त करण्यात आला.

त्यानंतर धामणगाव रोडवरील चितळवाडी शिवारातील हॉटेल समाधान येथे छापा टाकण्यात आला. दत्तु रंगनाथ नरवडे (वय ५२, रा. माणिकदौंडी ) याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या. ५ हजार १९० रुपयांचा दारूसाठा यामध्ये जप्त करण्यात आला.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गणेश पोपट लोंढे, बिरप्पा करमल, अभिजीत अरकल, सतीश भवर, भगवान सानप व दीपक जाधव यांच्या पथकाने केली. पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी झालेल्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT