पाथर्डी: तालुक्यात रक्त व लघवी तपासणी करणाऱ्या केंद्रांचा मोठा सुळसुळाट झाल्याचे उघड झाले आहे. तालुक्यातील एकूण 47 तपासणी केंद्रांपैकी केवळ 13 केंद्रेच अधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उर्वरित 35 केंद्रे अनधिकृतरीत्या सुरू असल्याचे सरकारी तपासणीत स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी अनधिकृत केंद्रात केल्याच्या प्रकारामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी यांनी दिले आहेत.
तालुक्यातील रक्त-लघवी तपासणी केंद्रांबाबत झालेल्या तपासणीत अनेक केंद्र चालकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, परवाने व वैद्यकीय मान्यता नसल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिक्षक यांनी अहवाल सादर केला असून त्यात 35 केंद्रे अनधिकृत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे या अनधिकृत केंद्रांनी दिलेल्या तपासणी अहवालांवर तालुक्यातील सुमारे पन्नास वैद्यकीय व्यावसायिक रुग्णांवर उपचार करीत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी करणे बंधनकारक असते. ही तपासणी शासकीय आरोग्य उपकेंद्रांमध्ये मोफत केली जाते. तरीही हनुमान टाकळी येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी तिसगाव येथील एका अनधिकृत रक्त-लघवी तपासणी केंद्राकडून 51 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करून घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
तपासणीदरम्यान रिया बारहाते या विद्यार्थिनीला त्रास झाल्याने पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याची तक्रार भारत गायकवाड या पालकांनी जिल्हा परिषदेकडे लेखी स्वरूपात केली आहे. सरकारी दवाखान्यात मोफत तपासणी उपलब्ध असताना अनधिकृत खासगी केंद्रात पैसे देऊन तपासणी का करण्यात आली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी म्हणाले, हनुमान टाकळी येथील पालकांकडून लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. प्रकरण गंभीर असून संपूर्ण चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत रक्त-लघवी तपासणी केंद्रांबाबतही तपास केला जाणार आहे.
दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी सांगितले, तालुक्यातील अनधिकृत 35 रक्त-लघवी तपासणी केंद्रांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी तीन ते चार वेळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. काही केंद्रांनी बंद केल्याचे लेखी दिले असले तरी प्रत्यक्षात अनेक केंद्रे सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस देऊन ही केंद्रे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.