Pathardi College Girl Case Pudhari
अहिल्यानगर

Pathardi College Girl Case: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा

माहिती देण्याच्या बहाण्याने ३० हजारांची खंडणी वसूल

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: तालुक्यातील एका गावातून १८ वर्ष ८ महिने वयाच्या एका महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी तन्मय जनार्धन ढाकणे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या व पैशांची मागणी करणाऱ्या इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी तन्मय जनार्धन ढाकणे (वय १९, रा. काटेवाडी), जनार्धन काशिनाथ ढाकणे, प्रशांत मुरलीधर सारुख (रा. जिरेवाडी, ह.मु. आळंदी, पुणे), रविंद्र पोपट घुले (रा. काटेवाडी, पाथर्डी) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तन्मय ढाकणे याच्या लग्नासाठी त्याच्या वडिलांनी मुलीच्या घरी मागणी घातली होती. मात्र, तन्मय हा अल्पवयीन असल्याने मुलीच्या वडिलांनी या लग्नास नकार दिला होता.

याचाच राग मनात धरून तन्मयने मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ८ मे २०२६ रोजी सकाळी ही तरुणी घरातून बेपत्ता झाली. सुरुवातीला पाथर्डी पोलिस ठाण्यात ती हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

शोध सुरू असतानाच संशयित आरोपी तन्मयही घरातून निघून गेल्याचे समोर आले. मुलीचा शोध घेत असताना, आरोपी रविंद्र पोपट घुले याने मुलीची माहिती देतो असे सांगून मुलीच्या हताश वडिलांकडून फोन पेद्वारे ३० हजार रुपये उकळले.

मात्र, पैसे घेऊनही त्याने कोणतीही माहिती न देता फसवणूक केली. संशय बळावल्याने मुलीच्या वडिलांनी आरोपी जनार्धन ढाकणे, प्रशांत सारुख आणि रविंद्र घुले यांचा माग काढला. हे तिघे नाशिक येथे गेले असता, तेथे ते संशयित आरोपी तन्मय ढाकणे याला भेटले आणि त्यांनी त्याला खाण्यापिण्याचे साहित्य व पैशांची मदत केली.

मुलीच्या वडिलांनी तेथे जाऊन विचारणा केली असता, मुलगी तन्मयसोबतच आहे, तन्मयचे लग्नाचे वय झाल्यावर आम्ही त्यांचे लग्न लावून देऊ, असे सांगत आरोपींनी वडिलांना शिवीगाळ व दमदाटी केली.

आपल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले असून, इतर आरोपी त्याला मदत करत असल्याचे व पैशांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर वडिलांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT