

नगर: जिल्हा पोलिस दलात गेल्या काही दिवसांपासून प्रभारी अधिकार्यांच्या बदल्यांची चर्चा होती. आज अखेर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांसह नव्याने जिल्ह्यात आलेल्या 19 अधिकार्यांच्या बदल्या केल्या.
तसे आदेश गुरूवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची साई मंदिर सुरक्षा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अधिकार्यांच्या बदल्यांची चर्चा होती. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतःच्या वेगळ्या स्टाईलने जिल्ह्यात पोलिसिंग सुरू केली. पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्रॉस रेड धडाका सुरू केल्याने प्रभारी पोलिस अधिकार्यांचे धाबदणाणले होते.
तर, जिल्ह्यात अवैध धंद्याला चांगलाच चाप बसला. नाशिक परिक्षेत्रातील अधिकार्यांच्या बदल्या झाल्यानंतर गुरूवारी जिल्हांतर्गत पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. पोलिस ठाण्यात दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकार्यांच्या प्रमुख्याने बदल्या करण्यात आल्या आहेत.
तर, वादग्रस्त कारकीर्द आणि नागरिकांच्या तक्रारी आलेल्या अधिकार्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून साईड पोस्टिंग असलेल्या अधिकार्यांना पोलिस ठाणे मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
देशमुख, वैद्य कोतवाली, तोफखान्याचे कारभारी जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक हेवी पोलिस ठाणे म्हणून अहिल्यानगर शहरातील तोफखाना आणि कोतवाली पोलिस ठाण्यांकडे पाहिले जाते. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक जगदिश भांंबळ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक बालाजी मदने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर, कोवताली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी दिली असून, त्यांच्या जागी श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे नितीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एलसीबीचे किरणकुमार कबाडी साई दरबारी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. ड्रग्ज चोरी प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यांच्या कामकाजाबद्दल विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तर, सामाजिक कार्यकर्त्यांनी आयजी, डीजीकडे त्यांच्या तक्रारी केल्या होत्या.
त्याच पार्श्वभूमीवर त्यांची प्रशासकीय बदली करण्यात आल्याचे समजते. तूर्त एलसीबीची जागा रिक्त ठेवण्यात आली असून, तत्पुरता पदभार सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलिस अधिकार्यांची बदली कोठून कोठे
पोलिस निरीक्षक जगदिश भांबळ (तोफखाना पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष), रवींद्र देशमुख (नियंत्रण कक्ष ते राहुरी पोलिस ठाणे), विलास पुजारी(पाथर्डी पोलिस ठाणे ते मानवसंसाधन विभाग), संभाजी गायकवाड (कोतवाली ते दहशतवाद विरोधी पथक), किरण शिंदे (श्रीगोंदा ते ए.एच.टी.यू), संजय ठेंगे (राहुरी ते श्रीगोंदा), नितीन देशमुख (श्रीरामपूर ते कोतवाली), आनंद कोकरे (मानवसंसाधन विभाग ते पाथर्डी पोलिस ठाणे)
प्रताप दराडे (नियंत्रण कक्ष ते नेवासा), बाबासाहेब बोरसे (शहर वाहतूक शाखा ते घारगाव पोलिस ठाणे), महेश पाटील (नियंत्रण कक्ष ते शहर वाहतूक शाखा), दीपक सरोदे (नियंक्षण कक्ष ते राहाता पोलिस ठाणे), बालाजी वैद्य( ए.एच.टी.यू ते तोफखाना), हनुमान गायकवाड(नियंत्रण कक्ष ते कर्जत). सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे (आर्थिक गुन्हे शाखा ते लोणी), माणिक चौधरी(एमआयडीसी ते आर्थिक गुन्हे शाखा), जगदिश मुलगीर (भिंगार कॅम्प ते आर्थिक गुन्हे शाखा), हेमंत थोरात (घारगाव ते एमआयडीसी), महिला सहायक पोलिस निरीक्षक तेजस्विनी थोरात(कोतवाली ते भिंगार कॅम्प).