

जामखेड: जामखेड पंचायत समितीच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांचे बांधकाम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले असतानाही विद्युत कामे रखडल्याने सदनिकांचा वापर अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या इमारती अनेक दिवसांपासून रिकाम्याच पडून असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने या प्रकल्पास १५ जुलै २०२१ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. सुमारे १०.९१ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेत पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त शासकीय निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. निविदा प्रक्रियेनंतर हे काम औरंगाबाद येथील श्रीनिवास वास्तू निर्माण संस्थेला देण्यात आले होते.
या प्रकल्पांतर्गत दोन प्रकार-१ इमारतींमध्ये २४ सदनिका, प्रकार-२ इमारतीत ८ सदनिका, प्रकार-३ इमारतीत ४ सदनिका, तसेच एक स्वतंत्र शासकीय बंगला अशा एकूण ३७ निवासस्थानांची निर्मिती करण्यात आली आहे.
इमारतींमध्ये दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर करण्यात आला असून, अंतर्गत व बाह्य रंगकाम, कंपाऊंड वॉल, पर्जन्यजल संचयन व्यवस्था, सुशोभीकरण यांसारखी कामेही करण्यात आली आहेत.
बांधकाम, प्लास्टरिंग, रंगकाम आणि इतर नागरी कामे पूर्ण झाली असली, तरी विद्युत यंत्रणेची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. वीज जोडणी, अंतर्गत वायरिंग आणि संबंधित तांत्रिक बाबी प्रलंबित असल्याने सदनिकांमध्ये वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. परिणामी, वापरासाठी तयार असलेल्या इमारती अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देता आलेल्या नाहीत.
शासकीय निवासस्थानांची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही केवळ विद्युत कामांच्या विलंबामुळे सदनिकांचा ताबा मिळत नसल्याने त्यांना खासगी निवासाची व्यवस्था करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शासनाचा निधी खर्च करून उभारलेली मालमत्ता वापराअभावी पडून असल्याचीही चर्चा आहे.
स्थानिक स्तरावरून संबंधित वीज ठेकेदाराने कामाची गती वाढवून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.
विद्युत कामे पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर या सदनिकांचा ताबा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पंचायत समितीच्या शासकीय निवासस्थान प्रकल्पातील बांधकामाची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. सध्या काही विद्युत कामे प्रलंबित असून, संबंधित वीज ठेकेदाराला ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित कामे पूर्ण होताच सदनिकांचा ताबा अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येईल.
- शुभम जाधव, गटविकास अधिकारी, जामखेड