Bride Fraud Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Bride Fraud Case: पाथर्डीत नवरीचा पलायन प्रकार; लग्नानंतर काही तासांतच दागिने घेऊन फरार

एजंटामार्फत लावलेल्या लग्नात फसवणूक; कुटुंबीयांचा पोलिसांत धाव, तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: तालुक्यातील सुसरे येथे एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, एजंटामार्फत पैसे देऊन आणलेल्या नवरीने लग्नानंतर अवघ्या काही तासांतच घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुसरे येथील 24 वर्षीय तरुणाचे जालना जिल्ह्यातील मुलीशी एजंटाच्या मध्यस्थीने लग्न ठरविण्यात आले होते. यासाठी मुलीच्या नातेवाईकांना मोठी रक्कम देण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 3) सकाळी विधिवत विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री सुमारे आठच्या सुमारास नववधू सुसरे येथे नवरदेवाच्या घरी दाखल झाली.

घरात पारंपरिक शुभविधी पार पडले. नव्या संसाराची सुरुवात होत असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. पहाटे सुमारे चारच्या सुमारास नववधूने घरातील मोबाईल, एक तोळ्याची पोत, तसेच नवरदेवाने घातलेले एक तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले.

सकाळी हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेव व त्याच्या नातेवाईकांनी तातडीने पाथर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील विवाह व्यवस्थेतील वाढत्या अडचणी आणि एजंटामार्फत होणाऱ्या विवाहातील धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत. मुला-मुलींच्या विवाहासाठी निर्माण झालेल्या सामाजिक अडचणींचा गैरफायदा घेत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून संबंधित नववधू व एजंटचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT