108 Ambulance  Pudhari
अहिल्यानगर

108 Ambulance Doctor Controversy: गर्भवती महिलेची ‌‘108‌’मध्ये हेळसांड; मद्यधुंद डॉक्टर, रुग्णवाहिकेची दिरंगाईने पाच तास फरफट

चालकाने अर्ध्या तासात पोहोचण्याचे आश्वासन दिले. मात्र केवळ 14 किलोमीटर अंतर असूनही रुग्णवाहिका सुमारे एक ते दीड तास उशिरा पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मिरी: आपत्कालीन आरोग्यसेवेत कार्यरत असलेल्या 108 क्रमांकावरील रुग्णवाहिकेतील डॉक्टरच मद्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील एका घटनेनंतर समोर आला.

प्रसूतीसाठी नेण्यात येणाऱ्या गर्भवतीला वेळेत वैद्यकीय मदत मिळण्याऐवजी आरोग्य व्यवस्थेतील कथित गोंधळ, रुग्णवाहिकेचा विलंब आणि वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर 108 हेल्पलाइनवर संपर्क साधण्यात आला. त्यानुसार तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबंधित रुग्णवाहिका पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. चालकाने अर्ध्या तासात पोहोचण्याचे आश्वासन दिलेे. मात्र केवळ 14 किलोमीटर अंतर असूनही रुग्णवाहिका सुमारे एक ते दीड तास उशिरा पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रुग्णवाहिका येण्यास झालेल्या विलंबाबाबत विचारणा केली असता संबंधित डॉक्टरने उद्धट भाषा वापरत अरेरावी केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टर पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असून त्याला नीट बोलताही येत नव्हते आणि व्यवस्थित चालताही येत नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तरीही कुटुंबीयांनी वाद टाळत महिलेला सुरुवातीला मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

मिरी येथे तपासणीनंतर महिलेला नगर येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रुग्णवाहिकेतील डॉक्टरचे वर्तन अधिकच आक्रमक झाल्याचा आरोप आहे. ‌‘पेशंटचे काय करायचे ते माझ्या हातात आहे‌’ अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे गर्भवती महिलेला त्या रुग्णवाहिकेतून पुढे पाठविण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.

यावेळी होत असलेल्या प्रकाराचे नातेवाइकांनी चित्रीकरण सुरू केल्यानंतर संबंधित डॉक्टरने शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे गर्भवती महिलेला मात्र वेदना होत होत्या, असे उपस्थितांनी सांगितले.

दरम्यान, सुरुवातीला मिरी येथील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा 108 सेवेशी संपर्क साधण्यात आला. कुकाणे येथील रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र नगरऐवजी आधी पाथर्डी आणि नंतर नगरला नेण्याची भूमिका संबंधित डॉक्टरांनी सांगितल्याने नातेवाईक आणखी हतबल झाले.

अखेर मिरी येथील 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर महिलेला नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली ही धावपळ मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहिली. या संपूर्ण कालावधीत गर्भवती महिला वेदनांशी झुंज देत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

आपत्कालीन आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यावर मद्यप्राशन, गैरवर्तन व धमकावल्यासारखे गंभीर आरोप होत असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व नातेवाइकांनी केली आहे.

सदर घटनेची माहिती घेतली असून, झालेल्या प्रकाराचे व्हिडिओदेखील बघितले आहेत. त्यामध्ये संबंधित डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल.
- सुवर्णमाला गोखले, जिल्हा व्यवस्थापक, 108 रुग्णवाहिका यंत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT