

पाथर्डी: पाथर्डी पोलिसांनी अवैध औषध विक्रीविरोधात धडाकेबाज कारवाई करत जिममधील तरुणांना प्रोटीन व स्नायूवर्धक औषधांच्या नावाखाली गुंगीकारक इंजेक्शन विक्री करण्याच्या संशयित रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 62 हजार 504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे.
दि. 4 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाथर्डी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागासह संयुक्त कारवाई केली. या पथकात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल लहाने, सहायक फौजदार विलास जाधव, कॉन्स्टेबल इजाज सय्यद, संजय जाधव, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, सचिन हाडके, प्रवीण भोजे, आप्पासाहेब तांबे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक शेख जावेद हुसेन सहभागी होते.
तालुक्यातील करंजी येथील चौफुली परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका युवकाची तपासणी करण्यात आली. त्या वेळी त्याच्याकडे असलेल्या पिशवीतून मेफेन्टरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या आठ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. सुरुवातीला संबंधित युवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शेरू राजू शेख (वय 25, रा. इंदिरानगर, पाथर्डी) असे सांगितले. चौकशीदरम्यान शेरू शेख याने ही औषधे अहिल्यानगर येथील मुकुंदनगर परिसरातील मोहसिन शेख याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली.
ही औषधे व्यायामशाळेत जाणाऱ्या तरुणांना तसेच इतर ग्राहकांना स्नायूवर्धक औषध अथवा प्रोटीन असल्याचे भासवून विक्री करण्याचा त्याचा उद्देश असल्याचे तपासात समोर आले आहे.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय व वैध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे विक्रीसाठी आणण्यात आल्याचेही उघड झाले. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक शेख जावेद हुसेन यांना पाथर्डी पोलिसांनी माहिती दिली. त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन औषधांची तपासणी केली असता संबंधित इंजेक्शन हे ‘एच’ प्रवर्गातील औषध असल्याचे स्पष्ट झाले.
अशा प्रकारची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नाहीत. तसेच त्यांचा अयोग्य वापर मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. या कारवाईत 2 हजार 504 रुपये किमतीच्या इंजेक्शनच्या आठ बाटल्या, दोन मोबाईल असा एकूण 62 हजार 504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासणीसाठी चार कुप्यांचे नमुने सीलबंद करून ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित कुप्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी शेरू राजू शेख याच्यासह मोहसिन शेख (रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसिन शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत.
तरुणांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार उघड
व्यायामशाळांमध्ये शरीरसौष्ठवासाठी येणाऱ्या तरुणांना प्रोटीन किंवा स्नायूवर्धक औषध असल्याचे भासवून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गुंगीकारक औषधांची विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब या कारवाईत समोर आली आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर औषध विक्रीच्या साखळीचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून तरुणांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधितांवर आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.