

नगर: विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. करण ससाणे, मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे उमेदवारी अर्ज मागे घेतले.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दत्तात्रेय पानसरे हे निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याने महायुतीत बंडखोरीचे संकेत मिळाले. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अशा वेळी आमदार संग्राम जगताप यांनी मुत्सद्दीपणे ही निवडणूक हाताळताना शेवटच्या क्षणी पानसरेंची माघार घडवून आणत महायुतीकडून प्राजक्त तनपुरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा केला.
दरम्यान, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या चार दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या प्रयत्नातून महायुतीला हे यश मिळालेच, याशिवाय अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलताना पाहायला मिळणार आहे.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी नगरमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे दिसले. भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर, अपक्ष म्हणून करण ससाणे, दत्ता पानसरे, मच्छिंद्र धुमाळ, आणि कमलेश गांधी असे चार अर्ज होते. गुरुवारी (दि. 4) अर्ज माघारीची शेवटची मुदत होती. त्यामुळे तनपुरेंना बिनविरोध करण्यासाठी डॉ. सुजय विखे यांची विशेष यंत्रणा काम करत होती.
यासाठी पडद्यामागेही घडामोडी सुरू होत्या. काल दुपारी 12.30 च्या सुमारास नगरच्या प्रेमदान चौकात करण ससाणे, मच्छिंद्र धुमाळ आणि दत्ता पानसरे यांची एक मॅरेथॉन बैठक झाल्याचे समजते. यामध्ये धुमाळ आणि ससाणे यांनी आपली निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचे स्पष्टपणे सांगीतले, तशी कारणेही दिली. त्यावर पानसरे यांनी ‘मग मीच अर्ज ठेवतो,’ असे सांगून ‘पुढील’ नियोजनही ठरवले.
त्यानंतर धुमाळ आणि ससाणे यांनी आपापल्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतले. त्याच दरम्यान कमलेश गांधी यांनीही आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला. आता फक्त पानसरे यांचाच एक अर्ज राहिला होता. त्यामुळे तनपुरे समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हळूहळू राहुरीच्या कार्यकर्त्यांची गर्दीही वाढू लागली होती.
सुरुवातीला ‘पानसरे यांच्याशी चर्चा झाली आहे, ते 2 वाजून 45 मिनिटांनी आपला अर्ज काढण्यासाठी येणार आहेत,’ अशी कुजबूज ऐकायला मिळाली. त्यामुळे तनपुरे समर्थक उल्हासित झालेे. मात्र, अगदी 2 वाजून 54 मिनिटे झाली तरीही पानसरे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचलेच नाहीत.
मग मात्र काही तरी वेगळं ‘शिजतंय’ याची तनपुरे समर्थकांना चाहूल लागली. याच कालावधीत पानसरे यांच्या सूचकांपैकी शाहबाज सय्यद नामक एका सूचकाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून पानसरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या वेळी तेथे पानसरे यांचे काही कार्यकर्ते अगोदरच हालचालींवर लक्ष ठेवून होते.
त्यांनी हा प्रकार पाहताच पानसरेंशी संपर्क साधला. याशिवाय लगेचच ही प्रक्रिया चुकीची असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला, त्यावर आक्षेप नोंदवला. आता 2 वाजून 58 मिनिटे झाली.
मोठा गोंधळ सुरू झाला. पानसरे यांनी कार्यकर्त्यांना ‘आपली माघार नाही, माझी खोटी सही आहे,’ असे फोनवरून माध्यमांना आणि कार्यकर्त्यांनाही सांगितले आणि ते स्वतः धावत 3 वाजून 17 मिनिटांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाले. त्यांच्यासोबत बाळासाहेब नाहाटा होते. त्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.
पानसरेंचे आरोप?
माझा उमदेवारी अर्ज माझ्याशिवाय अन्य कोणी मागे घेऊन नये म्हणून मी अर्ज दिलेला आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी आणि मतदारांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवारी करणार आहे. अर्ज माघारीची विड्रॉल स्लीप खोटी आहे. माझी त्यावर सही नाही. चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी काम केले असेल तर मी येथे आत्मदहन करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पणन महासंघाचा राजीनामा देत असल्याचे माध्यमांसमोर सांगत निवडणूक लढवायचीच, असा निर्धार त्यांनी केला.
समर्थक आमनेसामने
पानसरे यांनी नाहटा व कार्यकर्त्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला. त्याचवेळी तनपुरे समर्थक आक्रमक झाले. यावेळी ॲड. राहुल शेटे यांनी जर त्यांना येथे बसण्याची परवानगी असेल, तर आम्हालाही या ठिकाणी बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली. यातून गोंधळ वाढला. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर परिस्थिती निवळली.
मुख्यमंत्र्यांशी संवाद; पानसरे ‘समाधानी’
जिल्हाधिकारी हे या प्रकरणाची शहानिशा करत असताना, पानसरे तिथेच तळ ठोकून होते. त्यांनी शेजारील एका केबिनमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी प्राजक्त तनपुरे हे तिथे आले. ते देखील त्याच केबिनमध्ये गेले. काही वेळानंतर पानसरे बाहेर आले. आमदार संग्राम जगताप हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यांनी पानसरे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. काही वेळानंतर पानसरेंना घेऊन ते बाहेर पडले.
या दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पानसरेंशी संपर्क करत चर्चा केली. यातून पानसरे काहीसे नरमले. त्यांच्या सांगण्यावरूनच आ. जगताप यांनी पानसरे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद घडवून आणला. त्यानंतर कुठे पानसरे मागे आले.
आ. जगताप यांनी पानसरेंना जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन येत, अर्ज माघारीवर शिक्कामोर्तब केले अन् महायुतीकडून प्राजक्त तनपुरे यांचा आमदारकीचा मार्ग अखेर मोकळा झाला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या नाराजीनाट्यावर पडदा टाकण्यासाठी महायुतीचे ‘पालकत्व’ यशस्वीरित्या पार पाडल्याचे दिसले. दरम्यान, पानसरे यांचे या काळात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांच्याशीही मोबाईलवरून चर्चा झाली.
ससाणेंनी नेमकी का घेतली माघार?
तत्पूर्वी, करण ससाणे यांनी अर्ज माघारी घेतला. ते म्हणाले, की मी पक्षाकडून अर्ज भरलेलाच नव्हता. नगरसेवकांच्या आग्रहाखातर अर्ज भरला होता. निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हतीच. मी पक्षाकडे मागणी केली नव्हती. पक्षानेही विचारणा केली नव्हती. श्रीरामपूरच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे अर्ज भरला आणि त्यांच्याशी चर्चेनंतर अर्ज माघारी घेतला. पक्षाचे तिकीट मागितले नव्हते. पक्षाने तशी माझ्याशी चर्चा केलेली नव्हती. मच्छिंद्र धुमाळ तसेच कमलेश गांधी यांनीही आपले अर्ज माघारी घेतले.
समजूत काढण्यास यश : विखे
निवडणूक बिनविरोध करताना राष्ट्रवादी पक्षाचे अपक्ष उमेदवार पानसरे यांची समजूत काढण्यात आणि त्यांना वास्तव्य समजून सांगण्यात आम्हाला यश आले. ही निवडणूक बिनविरोध करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच महायुतीमधील सर्वच घटक पक्षांतील नेत्यांचे सहकार्य मिळाले, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
अपक्ष उमेदवार पानसरे यांनी माघारीचा अर्ज दिल्यानंतर निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर गुरुवारी (दि.4) सायंकाळी पालकमंत्री विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, दत्तात्रय पानसरे हे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
ते माघार घेणार होते. परंतु काही समज व गैरसमज निर्माण झाले होते. महाविकास आघाडीमधील काहींनी त्यांचा बुध्दीभेद केला. आपण राजकीय बळी ठरत असल्याचे पानसरे यांच्या लक्षात आले. तसेच पानसरे यांची आम्ही समजूत काढली. त्यातूनच निवडणूक बिनविरोध झाल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांमुळे माघार : पानसरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुन्नेत्रा पवार, एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगतापव माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी माघारीचे आवाहन केल्याने मी माघार घेतल्याचे पानसरे यांनी सांगितले. मी कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही.
या निवडणुकीत आमदार झालेले प्राजक्त तनपुरे यांनी आता जिल्हाभरातील नगरसेवकांच्या भेटी घेण्यासाठी वाड्याबाहेर पडावे. जिल्हाभरातील नगरसेवकांची कामे करावीत, असे आवाहन त्यांनी तनपुरे यांना केले. माझ्या पाठीमागे आमदार संग्राम जगताप हा दादा उभा असल्यामुळे दिवसभरात माझ्यावर असलेला दबाव नाहिसा झाल्याचेही पानसरे म्हणाले.