Ambulance Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Ambulance Service: पाथर्डीमध्ये 108-102 रुग्णवाहिका सेवा विस्कळीत; खासगी वाहनांवर रुग्णांचा भार

वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांचा खासगी वाहनांवर हजारो रुपये खर्च; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी टोल फ्री 108 आणि 102 रुग्णवाहिका सेवा पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध असूनही त्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी गरीब आणि गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकांवर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.

पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात 108 आणि 102 अशा दोन टोल फ्री रुग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र प्रत्यक्षात या रुग्णवाहिका नागरिकांना विविध कारणे देत वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी रात्री दोन परप्रांतीय कामगारांचा अपघात झाला. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना अहिल्यानगर येथे हलवण्याचा सल्ला दिला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहानवाज शेख आणि अण्णा हरेर यांनी 108 आणि 102 रुग्णवाहिका सेवेसाठी संपर्क साधला. मात्र 108 रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. तर 102 रुग्णवाहिकेच्या चालकाने ‌‘मी दिवसभर दमलो आहे, येऊ शकत नाही,‌’ असे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या कामगारांना खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागला. विशेष म्हणजे, संबंधित दोन्ही रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्शनी भागात न ठेवता रुग्णालयाच्या पाठीमागील शासकीय निवासस्थान परिसरात आडोशाला उभ्या असल्याचे निदर्शनास आले.

नादुरुस्त असल्याचे सांगितली जाणारी 108 रुग्णवाहिका प्रत्यक्षात दुरुस्त असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे रुग्णवाहिका सेवा नेमकी कोणासाठी आणि कशी चालवली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शेख आणि हरेर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार तसेच 108 रुग्णवाहिका सेवेबाबत मानवाधिकार आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. यावर मागील आठवड्यात सुनावणीही झाली. मात्र 108 रुग्णवाहिका सेवेचे कोणतेही प्रतिनिधी सुनावणीस उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. रुग्णसेवेसाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना गरजू रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

रुग्णवाहिका समोरच उभ्या ठेवण्याची मागणी

पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील 108 व 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका मागील बाजूस उभ्या राहत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या रुग्णवाहिका कायमस्वरूपी रुग्णालयाच्या समोरच ठेवाव्यात, अशी मागणी हरेर यांनी केली. रुग्णवाहिकांसाठी रुग्णालयासमोर स्वतंत्र जागा निश्चित करून तेथे माहिती फलक व हालचाल रजिस्टर ठेवावे, अशी मागणी शेख यांनी केली आहे. रुग्णवाहिका उपलब्ध आहे की पेशंट घेऊन बाहेर गेली आहे, याची स्पष्ट माहिती दर्शविणारे फलक लावण्याचीही त्यांनी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT