पारनेर : तालुक्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती बांधकाम विभागाचे उप अभियंता एस. बी. वसईकर यांनी दिली.
सामाजिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही रस्त्यांची कामे नव्याने सुरू आहेत. मात्र, निधीअभावी ही कामे रखडलेली आहेत. या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. याबाबत उपअभियंता वसईकर म्हणाले, खड्डेमय रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्यात येणार असून, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर डांबर टाकून चांगल्या पद्धतीने मलमपट्टी करण्यात येईल, तसेच रखडलेले रस्त्यांची कामे त्वरित सुरू करून ठेकेदारांना या रस्त्याचे दर्जेदार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पारनेर-सुपा रस्त्याचे सध्या नव्याने काम चालू असून, देवीभोयरे फाटा ते खडकी असा हा रस्ताकाम केले जाणार आहे. देवीभोयरे फाट्याकडून कामाची सुरुवात झाली असून, चिंचोलीपर्यंत हे काम सध्या सुरू आहे. तसेच वाळवणे-रायताळे-अस्तगाव या भागात देखील काम सुरू आहे. मात्र, पारनेर ते सुपा या भागात अद्याप काम सुरू नसून, लवकरच येथे कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या भागात डांबरीवर पडणाऱ्या खड्ड्यांना तात्पुरते मुरूम टाकून बुजविण्यात येणार आहे.
पारनेर शहरात पावसाळ्यात रस्त्याची बिकट अवस्था झाली होती. मोठे खड्डे पडल्याने ते तात्पुरते बुजविण्यासाठी सिमेंट काँक्रेिट वापरण्यात आले. परंतु हा प्रयोग फसला. तसेच सिमेंट काँक्रीटमुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या भागात मोठे खड्डे तयार झाले असून, या खड्ड्यांची डांबर टाकून मलमपट्टी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
अनेक वर्ष रखडलेला लोणी हवेली रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पारनेर-पानोली-राळेगणसिद्धी-पारनेर-जामगाव- भाळवणी हे दोन्ही रस्ते राज्य महामार्गांना जोडण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू होते. परंतु निधी अभावी हे काम अर्ध्यावरच रखडले आहे. या रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. मात्र, पुन्हा नव्याने हे काम त्वरित सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वसईकर यांनी दिली.
तालुक्यातील बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी करण्यात आली. त्यातील काही रस्त्यांचे कामे सुरू करण्यात आली. तसेच काही रस्ते त्वरित सुरू करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात नागरिकांना रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागणार नाही, याची आपण दखल घेत असून तालुक्यातील खड्डे मुक्त रस्त्यांसाठी प्रयत्न आहे.एस. बी. वसईकर, उपविभागीय अभियंता, बांधकाम पारनेर