शशिकांत भालेकर
पारनेर: जून संपत आला तरी पारनेर तालुक्यात दमदार पाऊस पडलेला नाही. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या असून कृषी केंद्रामध्ये बियाण्यांचा साठा पडून आहे. तालुक्यातील धरण, तलाव, बंधारे व शेततळ्यातील पाण्याने तळ गाठला आहे. गत आठवड्यात हलका पाऊस पडला असला तरी जमिनीत अपेक्षित ओल निर्माण झालेला नाही. तालुक्यातील ९० टक्के हून अधिक भाग अद्यापही कोरडाठाक आहे.
पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो. येथील बहुतांश भाग पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी पातळी चांगली राहिली. तरीही उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली. जूनच्या सुरुवातीला पाऊस न पडल्याने चिंता वाढली. गेल्या वर्षी १ जून ते ३० जून २०२५ पर्यंतचा १०० मिमी पाऊस पडला होता. या वर्षी १ जून २०२६ ते आजपर्यंतचा पाऊस (मिमी) ३० ते ४० मिमी, अर्थात यंदा सरासरीच्या तुलनेत तूट ७० टक्के घट आहे. गेल्या वर्षी पहिला दमदार पाऊस १४ मे रोजी पडला होता.
शेततळी व विहिरींची स्थिती कोरड्या पडल्या आहेत. बोरवेलव्दारे काही प्रमाणात पाणी येत आहे. त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याबाबत चिंता निर्माण झाली असून पारनेर शहराला पिण्यासाठी हंगे तलावातून पाणीपुरवठा होत आहे. तर तालुक्यातील उर्वरित भागाला मांडओहोळ, कोहोकडी येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलसाठ्यामध्ये मध्यम प्रकल्प २ आहेत. प्रमुख तलावांची संख्या १०, त्यापैकी सर्वांचा मृतसाठा शिल्लक आहे. पाऊस आठ दिवस लांबणीवर पडला तर हे तलाव कोरडे पडतील. जलसाठा उपलब्ध २ टक्के शिल्लक आहे. यंदा मागणी केलेले ७००० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यापैकी फक्त ३०० च्या जवळपास बियाणे विक्री झाले आहे. ९५ टक्के साठा कृषी सेवा केंद्रात शिल्लक आहे. खतांची ३०१६३ मेट्रिक टन मागणी केली आहे. त्यात बकर स्टॉक ५९५ मॅट्रिक टन आहे. त्यापैकी आज अखेर शिल्लक साठा ७८५० मॅट्रिक टन आहे.
तीन टक्के पेरणी
गेल्यावर्षी पेरणी स्थिती ५५ पेरणी टक्के झाली होती. या वर्षी फक्त 3 टक्के पेरणी झाली आहे. तालुक्याचे एकूण लागवडी योग्य खरीप क्षेत्र १२३००० हेक्टर आहे. गेल्या वर्षी जूनअखेर १०५००० हेक्टर पेरणी झाली होती. यंदा पेरणी फक्त १५०० हेक्टरपर्यंत झाली आहे. यामध्ये मका व जनावरांच्या चारा पिकांची पेरणी आहे. वटाणा सोयाबीन बाजरी तुर कापूस या पिकांची तुरळक पेरणी झाली आहे. वटाणा, कांदा, मुग, बाजरी, सोयाबीन या पिकांची पेरणी खोळंबली आहे.
काही भागात थोडाफार पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. खतांचा, बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी नियोजन करून काळजी घ्यावी.गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी.
जून संपत आला आहे, तरीही तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. शासनाने तातडीने याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात.अनिल देठे, शेतकरी नेते
पिण्याच्या पाण्यासाठी सध्या ४१ टँकरद्वारे ४२ गावांना पाणीपुरवठा होत आहे. पाऊस न पडल्यास या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मांडओहोळ व कोहकडी येथे पाण्याचे उद्भव आहेत. यातील मांडओहोळ धरणाने तळ गाठला आहे. कालव्याचा आधार असलेल्या कोहकडी येथेच टँकर भरले जातील, अशी स्थिती आहे.दिलीप सोनकुसाळे, गटविकास अधिकारी