

नगर: अगोदर नीट फेरपरीक्षेमुळे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आता पेपरफुटीच्या संशयामुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ३१ हजार ६५५ परीक्षार्थी उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला असून, आता ही परीक्षा नेमकी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील १८०२ केंद्रांवर टीईटी-२०२६ आयोजित करण्यात आली होती. मात्र, शनिवारी पहाटे भिवंडी येथील पोलिस छाप्यात रविवारी होणाऱ्या टीईटी प्रश्नपत्रिकेशी साधर्म्य दर्शवित असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी आज २८ जून रोजीची टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले.
दरम्यान,अहिल्यानगर जिल्ह्यात पेपर क्रमांक १ साठी १३४९१ तर पेपर क्रमांक २ साठी १८१६४, असे ३१६५५ परीक्षार्थी नोंदणीकृत होते. त्यांच्यासाठी जिल्ह्यात ८७ परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते.
परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अधिकारी-कर्मचारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि पोलिस बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याने हजारो परीक्षार्थींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
परीक्षेबाबतच फेरविचार व्हावा!
जिल्ह्यातील हजारो शिक्षकांसह भावी गुरुजींनी टीईटी परीक्षेची पूर्ण तयारी केली असताना अशी पेपर फुटी होणे चिंताजनक आहे. शिक्षक संघटनांनी पहिल्यापासूनच या धोरणावर फेरविचाराची मागणी केली. त्यामुळे पेपर फुटीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा खरच गरजेची आहे का, याविषयी शासनाने विचार करण्याची मागणी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, यासह प्रवीण ठुबे, कल्याणराव लवांडे, भास्करराव नरसाळे, शरद वांढेकर, राजेंद्र निमसे, दिनेश खोसे, गौतम मिसाळ, एकनाथ व्यवहारे, नारायण पिसे, रवींद्र आरगडे यांनी आहे.