Onion Farmers Protest Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Onion Farmers Protest: पारनेरमध्ये कांदा लिलाव बंद; नाफेड दर निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप

नाशिकपुरता खरेदी दर लागू केल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी आक्रमक; बाजार समितीत जोरदार आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाफेडमार्फत प्रतिकिलो 15.80 रुपये दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवण्यात आल्याने अहिल्यानगरसह राज्यातील इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, मजुरी, वीज आणि वाहतूक यावर प्रचंड खर्च करावा लागतो. मात्र, बाजारात कांद्याला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पीक घेतले असून, आता बाजारातील पडलेल्या भावामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा, अशी मागणी यावेळी सुजित झावरे पाटील यांनी केली.

एकीकडे कांद्याचे भाव कोसळत असताना दुसरीकडे व्यापारी आणि दलाल मात्र नफा कमावत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकरी मात्र आपल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने हवालदिल झाला आहे. कांद्याचे भाव कोसळले की शेतकरी आठवतो आणि भाव वाढले की निर्यातबंदी केली जाते. मग शेतकऱ्याने जगायचे कसे? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. यावेळी डॉ.कोमल भंडारी, अरुण ठाणगे, अमोल साळवे, महेंद्र पांढरकर, सतीश पिंपरकर, रुपेश ढवण, राहुल तामखडे, संदीप औटी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्यथा रोषाला सामोरे जावे लागणार!

नाशिकमधील शेतकरी आणि अहिल्यानगरमधील शेतकरी यांच्यात काय फरक आहे? संकट सर्वांचे समान असताना सरकारची मदत केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवणे हा उघड अन्याय आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करून किमान 20 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा यावेळी सुजित झावरे पाटील यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले असून तहसीलदारांना याची प्रत देण्यात आली आहे.सभापती गंगाराम बेलकर, उपसभापती संदीप सालके व संचालक रा.या.औटी यांनी निवेदन स्वीकारले. आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या योग्य असून मागण्याचा पाठपुरावा बाजार समितीमार्फत केला जाईल, असे यावेळी आश्वासन देण्यात आले. या निवेदनात राज्यातील सर्व कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये नाफेड खरेदी केंद्रे सुरू करावीत, कांद्याला किमान 20 रुपये प्रतिकिलो दर द्यावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT