

नगर: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीत ही जागा भाजपच्या, तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने भाजपचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध काँग्रेसचे करण ससाणे अशी थेट लढत जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, महायुतीतील संभाव्य बंडखोरीमुळे निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः प्रीती सत्यजित कदम आणि सचिन अरुण जगताप यांच्यासह अन्य कोणकोणते अर्ज दाखल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपमध्ये भानुदास बेरड आणि सत्यजित कदम हे प्रमुख इच्छुक मानले जात होते. मात्र, नाट्यमय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनाच उमेदवारी बहाल करण्यात आली. या निर्णयानंतर भाजपमधील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. विशेषतः सत्यजित कदम समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, प्रीती सत्यजित कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा, यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी प्रीती कदम अर्ज दाखल करतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. नगरमधील ही जागा दिवंगत अरुणकाका जगताप यांची असल्याने त्यांचे सुपुत्र सचिन अरुण जगताप यांनी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. स्वतः सचिन जगताप यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपात भाजपने ही जागा घेतल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 2015 मध्ये अरुणकाका जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मिळवलेल्या विजयाची सचिन जगताप यांच्याकडून पुनरावृत्ती व्हावी, अशी भूमिका काही कार्यकर्त्यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी सचिन जगताप यांच्या नावाने उमेदवारी अर्जही घेण्यात आला आहे. ‘मी उमेदवारी करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी माझ्यासाठी अर्ज घेतला आहे,’ असे सचिन जगताप यांनी म्हटले आहे. त्यामुळे सचिन जगताप सोमवारी अर्ज दाखल करणार का याची उत्सुकता वाढली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब नाहाटा यांच्यासाठी उमेदवारी नेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याबाबत उत्सुकता आहे. यावर अनेक राजकीय समीकरणेही अवलंबून असतील. दरम्यान, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने करण ससाणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे तनपुरे विरुद्ध ससाणे अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे असली, तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राणीताई नीलेश लंके यांचा अर्ज दाखल होण्याची चर्चा आहे. तसेच नाहाटा, गांधी यांच्यासह काही अपक्ष रिंगणात उतरल्यास निवडणुकीचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे आजच्या राजकीय घडामोडींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि.1) शेवटचा दिवस आहे. भाजपमध्ये दाखल झालेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघाची मुदत संपून चार वर्षे उलटले आहेत. 18 जून रोजी या मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी 25 मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे आणि शेवगाव येथील कमलेश गांधी या दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. दाखल उमेदवारी अर्जांची मंगळवारी (दि.2) छाननी होणार असून, गुरुवारपर्यंत (दि.4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. याच दिवशी निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होणार आहे.