ST Bus pudhari photo
अहिल्यानगर

Palshi ST Bus Service: पळशी गावाचा एसटीशी संपर्क तुटला; नियमित बससेवेसाठी ग्रामस्थ आक्रमक

१९६२ पासून सुरू असलेली पळशी-पुणे बस बंद; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांची गैरसोय, आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर: तालुक्यातील पळशी हे भौगोलिकदृष्ट्या दुर्गम गाव असून, तेते आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. गावातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाची गैरसोय लक्षात घेता पळशी गावासाठी नियमित एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पळशीचे सरपंच प्रकाश राठोड यांनी पारनेर आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले की, पळशी-पुणे बससेवा सन १९६२ पासून सुरू होती. मात्र, पारनेर आगारातून दुसरी बससेवा सुरू झाल्यानंतर पळशी-पुणे बसचे उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शिरूर आगाराकडून ही बससेवा बंद करण्यात आली. परिणामी सध्या पळशी गावात कोणतीही एसटी बस येत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पळशी येथील आदिवासी नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना टाकळी ढोकेश्वर व पारनेर येथे ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच गावातील अनेक विद्यार्थी पारनेर, टाकळी ढोकेश्वर व नगर येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जातात. बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची, विशेषतः मुलींची मोठी गैरसोय होत असून त्यांच्या पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

पळशीसाठी सकाळी ७.३० वाजता आणि सायंकाळी ६.३० वाजता बससेवा सुरू करावी. तसेच साकूर-वासुंदे- माळवाडी- पळशी- खडकवाडी - साकूर असा बसमार्ग सुरू करण्याचाही विचार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बससेवेबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

पळशी-पुणे बससेवा सन १९६२ पासून सुरू होती. मात्र, बससेवा बंद झाल्याने सध्या पळशीचा सार्वजनिक वाहतुकीशी संपर्क तुटला आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पारनेर आगाराने पळशीसाठी नियमित बससेवा सुरू करावी.
प्रकाश राठोड, सरपंच, पळशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT