अकोले: आदिवासी भागातील मुळा - प्रवरा खोर्यातील राजूर, कोतुळसह खिरविरे, भंडारदरा परिसरात भात शेतीच्या कामांसह आवणीला वेग आला आहे. येथील भात शेती हा आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे, मात्र यंदा पावसाच्या लहरीपणामुळे भात पेरणीसह आवणीसाठी बळीराजापुढे मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत.
अकोले अतिदुर्गम भागासह बहुतांश डोंगर- दरीत वसलेला तालुका आहे. येथील आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय भात शेती आहे. तालुक्यातील खिरविरे, सातेवाडी, गुहिरे, घाटघर, सावरकुठे, कुमशेत व लव्हाळी खोरे हे भात शेतीसाठी प्रसिद्ध आहेत.(Latest Ahilyanagar News)
आदिवासी भागातील शेती पावसाच्या भरवशावरील, कमी उत्पन्न देणारी शेती म्हणून परिचित आहे. या भागातील जमीन डोंगराळ व खडकाळ भागात असल्याने उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही.
अशातच पाऊस कमी पडला तर, जेमतेम कुटुंबियांना पुरेल एवढेच धान्य पिकते. या जमिनीवर शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेती कसतात. अतिदुर्गम भागात पारंपरिक पद्धतीने भाताचे बियाणे फेकून रोपांची आवणी केली जाते, मात्र कालौघात वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व सुविधांमुळे आता काळानुरूप शेतीत बदल होताना दिसत आहे.
महिनाभरापूर्वी आदिवासी बांधवांनी गावागावात पारंपरिक पद्धतीने ग्रामदैवताच्या पांढरीची पूजा करून, शेती कामांचा श्रीगणेशा केला, मात्र पेरणीवेळी वरचा दाणा न उतरल्याने भात रोपे विरळ झाली आहेत. यामुळे लागवडीसाठी रोपांची टंचाई येण्याची शक्यता आहे. परिणामी काही भात खाचरे ओसाड राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणामुळे भात पेरणीसह आवणीपुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. थोड्या फार प्रमाणात उपलब्ध पाण्यामुळे अतिदुर्गम भागातील शेतकरी आता सुगंधित व अधिक उत्पन्न देणार्या भाताच्या लागवडीकडे वळला आहे. काही परिसरात जमिनीत चिखल तयार करून, त्याची मशागत करून शेतकरी भाताच्या रोपांची आवणी करीत आहेत.
13950 हेक्टरवर भात आवणी!
पाणी उपलब्धत आहे तेथे मोठ्या प्रमाणात जागोजागी भाताची आवणी करण्यात पुरुष - महिला शेतकरी व्यस्त झाले आहेत, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेती संकटात सापडली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकर्यांपुढे चिंता निर्माण झाली आहे. तरीही, आदिवासी बांधव मोठ्या नेटाने शेतीची मशागत करण्यात रमले आहेत. आदिवासी भागात एकूण 19400 हेक्टर भात क्षेत्र आहे. 13950 हेक्टरवर भाताची आवणी करण्यात आली आहे.
ट्रॅक्टर, रोटरचा आधुनिक वापर!
आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक बैलांच्या कुळवाऐवजी ट्रॅक्टर व रोटरद्वारे चिखल तयार केला जात आहे. आदिवासी गावांमध्ये भात आवणीची लगबग सुरु आहे. काही शेतकरी ‘गर्या’ वाणाच्या रोपांच्या लागवडीच्या प्रतिक्षेत आहेत.
पावसाने वाढविली बळीराजाची चिंता!
मुसळधार पावसामुळे भात रोपे पिवळी पडली, तर काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे रोपे कुजली आहेत. रोहिणी, आर्द्र व थोरला पुनर्वसू या नक्षत्रांमध्ये पावसाने अकोलेत थैमान घातल्यामुळे शेतकर्यांपुढे भात आवणीचा प्रश्न निर्माण झाला. धाकटा पुनर्वसू नक्षत्र पावसाने उसंत घेतल्याने भात आवणी रखडल्या आहेत. काही शेतकर्यांनी विहिर, तळे व बंधार्यांतून पाणी उपसून भाताची लागवड केली आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे भात आवणीला सध्या वेग आल्याचे दृश्य दिसत आहे.