

संगमनेर/घारगाव: चारित्र्याच्या संशयावरून कुर्हाडीने वार करत पत्नीचा खून करणार्या पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथील खंदारे वस्तीवर बुधवारी (दि.30 जुलै) मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
चंद्रकला दगडू खंदारे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. दगडू लक्ष्मण खंदारे (वय 65) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे. कुर्हाडीचे वार डोक्यात, मानेवर खोलवर गेल्याने चंद्रकला यांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Ahilyanagar News)
खंदारे कुटुंब टेकडीवरील घरात एकत्रित राहत असून वृध्द पती-पत्नी घराशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोपत. नेहमीप्रमाणे कुटुंबाने बुधवारी रात्री एकत्रित जेवण केले. जेवण करतेवेळी दगडू हे पत्नी चंद्रकला हिला शिवीगाळ करत होते. त्याला किंवा हिला एक दिवस मारून टाकणार असे ते बडबडत होते.
मुलाने त्यांना शांत करत झोपण्यासाठी जाण्याचे सांगितले. पती-पत्नी झोपण्यासाठी जात असताना दगडू यांनी दोरी हातात घेतली. त्यावेळी सकाळी धारा काढण्यासाठी लागेल असे मुलगा म्हणाल्याने त्यांनी ती तेथेच टाकून दिली. पती-पत्नी शेडमध्ये झोपण्यासाठी गेले.
दगडू यांनी पत्र्याच्या शेडला आतील बाजूने कुलूप लावले. त्यानंतर कुर्हाडीने पत्नी चंद्रकला यांच्या मानेवर, डोक्यावर कुर्हाडीने वार केले. पत्नीची हत्या केल्यानंतर तो आरोप संबंधित व्यक्तीवर जाईल, या हेतूने शेडच्या जाळीवरून उडी मारत ते नदीकाठी पोहचले. नदीच्या पाण्यात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पोहता येत असल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
नदीकाठावरून ते पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये आले. तेथे त्यांनी ओले कपडे बदलले. तेथून ते घारगाव पोलिस ठाण्यात गेले अन् पत्नीच्या खुनाची कबुली दिली. घारगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, महादेव हांडे, दत्तू चौधरी, विलास कोकाटे, बाबुराव गोडे हे घटनास्थळी पोहचले.
घटनास्थाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अटकेतील दगडू खंदारे यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मृत चंद्रकला यांचेवर घारगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
मुलानेच दिली वडिलाविरोधात फिर्याद
जेवताना आई-वडिलांचे भांडण झाल्याने इकडे मुलगा असवस्थ होता. वडिलांचा राग शांत झाला की नाही हे पाहण्यासाठी मुलगा रात्री एक वाजता पत्र्याच्या शेडकडे गेला. शेडमध्ये डोकावल्यानंतर त्यास आई रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली दिसली. वडिल तेथून पसार झाले होते. मुलाच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसात दगडू लक्ष्मण खंदारे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी दगडू खंदारे यास ताब्यात घेतले आहे.
गत दिवाळीतच चढला होता रागाचा पारा!
दगडू खंदारे हे शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अनेक दिवसांपासून त्यांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणातून रागारागात ते मागील वर्षीच्या दिवाळीत संबंधित व्यक्तीच्या घरी त्याला मारण्याच्या उद्देशातून गेले होते. मात्र मुलांनी वडिल व संबंधित व्यक्तीला समजावले होते. त्यानंतरही दगडू हा पत्नी चंद्रकला यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना शिवीगाळ, मारहाण करतच होता.