

नगर: शेतकर्यांसाठी सलग दोन वर्षे एक रुपयांत पंतप्रधान पीकविमा योजना शासनाने राबवली. त्यामुळे या योजनेसाठी अकरा लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले होते. यंदा मात्र शासनाने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केली. त्यामुळे यंदा अर्जांची संख्या घटली आहे.
गुरुवारी (31) पीकविम्यासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत 1 लाख 57 हजार शेतकर्यांनी 1 लाख 68 हजार 446 हेक्टर क्षेत्राला विमा कवच मिळावे यासाठी 3 लाख 14 हजार 174 अर्ज दाखल झाले आहेत. (Latest Ahilyanagar News)
अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच पावसाचा खंड आदीमुळे खरीप हंगामातील भात, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, मका, कांदा आदी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी पीकविमा योजना सुरु करण्यात आली आहे. राज्य शासनाने 2023 पासून पीकनिहाय एक रुपयांत पीकविमा योजना सुरु केली.
उर्वरित हप्ता शासन भरत होते. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यामुळे शासनाने 205-26 या वर्षांसाठी पीकविमा योजनेत बदल केला आहे. एक रुपयांत पीकविमा योजना शासनाने बंद केली. त्यामुळे शेतकर्यांना आता खरीप पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकर्यांची संख्या घटल्याचे दिसत आहे.
याशिवाय अर्जांबरोबर ई-पीक पाहणी अहवाल व शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक केले आहे. नव्या बदलानुसार आता पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच पिकांची नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात पीकविमा योजनेबाबत उदासीनता दिसत आहे.
पीकविमा योजनते सहभागी होण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत 1 लाख 68 हजार 446 हेक्टर क्षेत्रासाठी 3 लाख 14 हजार 174 अर्ज प्राप्त झाले होते. रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेतकर्यांची ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती.
शेतकरी संख्या कंसात अर्ज
नगर : 6806 (13315,), अकोले : 7798 (21381)
जामखेड : 17868 (45055), कर्जत : 6276 (14904)
कोपरगाव : 9827 (14252), नेवासा : 22275 (32425),
पारनेर : 13671 (3205), पाथर्डी : 16204 (45813),
राहाता : 11388 (16814), राहुरी : 10017 (14628),
संगमनेर : 8315 (16257), शेवगाव : 14941 (29440)
श्रीगोंदा :4328 (7939 ), श्रीरामपूर : 7292 (9794).