बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - मंत्री विखे पाटील file photo
अहिल्यानगर

Political News: बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - मंत्री विखे पाटील

चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी: पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर या प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा निष्कर्ष 2019 मध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही.

आमची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. नव्याने पुन्हा काही चौकशी होणार असली, तर त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, अशी भूमिका जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. (Latest Ahilyanagar News)

कारखान्याच्या संदर्भात प्रसारित झालेल्या वृत्ताबाबत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, की याबाबतची नेमकी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. 2004 साली झालेले प्रकरण आमच्या विरोधकांनी 2014 मध्ये उकरून काढले.

याबाबत स्थानिक न्यायालयापासून ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये याबाबतच्या सुनावण्या झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी अधिकार्‍यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होत नसल्याचे स्पष्ट करून, याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण केव्हाच संपलेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राहाता न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यांचा कलम 156(3) प्रमाणे केलेला आदेश कायम ठेवल्याने सदरचा गुन्हा दाखल झाला आहे. कोणतीही चौकशी ही गुन्हा दाखल झाल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे पुन्हा याच प्रकरणात नव्याने होणार्‍या चौकशीला सामोरे जाण्याची कारखाना व्यवस्थापनाची तयारी आहे.

मार्च 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या आदेशात कारखाना व्यवस्थापन व इतरांच्या विरोधात त्रास होईल अशी कोणतीही जबरदस्तीची कारवाई करू नये असा स्पष्ट आदेश दिलेला असल्याने या प्रकरणातील सर्वच स्पष्टता आता समोर आलेली आहे, असे विखे पाटील म्हणाले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने सलग आठ वेळा चांगल्या मताधिक्याने मला निवडून दिले आहे. जनतेचा विश्वास कामातून मी सार्थ ठरविला आहे, असे सांगून विखे पाटील म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यशही मोठे आहे. अनेकांना ते देखवत नाही. त्यामुळेच व्यक्तिद्वेषापोटी मला बदनाम करण्यासाठी विरोधक केविलवाणा प्रयत्न करतात. पण यात त्यांना यश मिळणार नाही..

निवडणूक आली, की वातावरण निर्माण करायचे आणि वैफल्यापोटी आरोप करायचे, ही आमच्या विरोधकांची सवय आहे. यामध्ये ते स्वतःची पत घालवून बसले आहेत. या सर्व प्रकरणात त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सांगण्याची आता आवश्यकता नाही. कारखान्याच्या बाबतीत एवढीच कळकळ त्यांना होती, तर निवडणुकीत सभासदांना सामोरे का गेले नाहीत. सद्यःस्थितीत त्यांनी उकरून काढलेल्या प्रकरणातील योजनेचे ते लाभार्थीही नाहीत जनतेचा विश्वास त्यांनी केव्हाच गमावला आहे, अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT