

पाथर्डी तालुका : अल्पवयीन मुलीसोबत पळून गेलेल्या युवकासह संबंधित मुलीला पाथर्डी पोलिसांनी हुशारीने सापळा रचून ताब्यात घेतले. ‘लग्न लावून देतो’ असे सांगत मुलीकडील नातेवाईकांनी दोघांचा विश्वास संपादन केला आणि पोलिसांच्या मदतीने लग्नस्थळीच त्यांना ताब्यात घेतले.
दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 10च्या सुमारास केरुळ (ता. आष्टी) येथील एका युवकाने तालुक्यातील करंजीजवळील एका गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यातून फसवून पळवून नेले होते. या घटनेबाबत मुलीच्या आईने पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी युवक व मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणात पोलिस अल्पवयीन मुलीचा जबाब घेऊन पुढील गुन्हा दाखल करणार आहे.(Ahilyanagar News update)
‘तुमचे लग्न लावून देतो’ असे सांगत दोघांना मंगळवारी (दि. 29) मुलीच्या नातेवाईकांनी तालुक्यातील वैजू बाबळगाव शिवारातील दत्त मंदिरात बोलावले. त्या ठिकाणी पाथर्डी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आधीच सापळा लावून सज्ज होते. नवरा-नवरीच्या पेहरावात दत्त मंदिरात आलेल्या दोघांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. नवरदेव लग्नाचा टोप, मुंडावळ्या आणि लग्नाचा पोशाख परिधान करून आला होता, तर नवरी लाल साडी व पारंपरिक मुंडावळ्या घालून सजली होती. मात्र, लग्नाऐवजी थेट पोलिस स्टेशनचा रस्ता त्यांना दाखवण्यात आला. गोड बोलून माझी फसवणूक केली, असे नवरा मुलगा सांगत पोलिस ठाण्यात कबुली दिली.
या कारवाईत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हरीश भोये, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, हवालदार विजय भिंगारदिवे, ईश्वर बेरड, पोपट आव्हाड, अक्षय वडते, दुर्योधन म्हस्के, उत्कर्षा वडते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला. या वेळी कायदेशीर कारवाई करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे लग्न होण्यापासून थांबवण्यात आले. या प्रकरणात युवकाबरोबर अन्य युवकाचे नातेवाईक यामध्ये आरोपी होणार असल्याची दाट शक्यता आहे.