Shirdi Crime News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी मंगल कलश यात्रेचे शिर्डी येथे आगमन झाले. विविध नद्यांचे पवित्र पाणी व विविध तिर्थक्षेत्राची माती संकलित करण्यात येत असून विविध ठिकाणी भेट देत ही रथयात्रा मुंबईकडे रवाना झाली होती. त्यावेळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी होते. या यात्रेत आमदार आशुतोष काळे, माजी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिर्डी लोकसभा कार्याध्यक्ष अशोक कानडे, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते हे देखील सहभागी झाले होते. या यात्रेत महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील मोठी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी माजी आमदार लहू कानडे व एका कार्यकर्त्याचे पाकीट मारून शिर्डी पोलिसांना सलामी दिली. (Ahilyanagar News Update)
त्यानंतर त्यांनी शिर्डी पोलिसात जाऊन या संदर्भात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे करीत आहे. शिर्डी पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला असून लवकरच या चोरट्याला जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने तपास सुरू असल्याचे शिर्डी पोलिसांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने यंदाच्या 65 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर मंगल कलश रथ यात्रा काढण्यात येत आहे. आज ही यात्रा शिर्डी येथे आली होती. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली