पारनेर: कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकर्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी संसद भवनाच्या मकर द्वारासमोर तीव्र आंदोलन केले.
यावेळी खासदारांनी कांद्याच्या माळा गळयात घालून केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. शेतकरी कोमात आणि सरकार जोमात अशी टीका करीत खासदार नीलेश लंके यांनी सरकारवर हल्लाबोल केला. (Latest Ahilyanagar News)
आंदोलनात खासदार डॉ. अमोल कोल्हे,खासदार नीलेश लंके, खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, बजरंग सोनवणे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर खासदार सहभागी झाले होते. शेतकर्यांच्या व्यथा मांडताना आंदोलकांचा सूर आक्रोशमय होता. विविध खासदारांनी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर कठोर शब्दात टीका केली.
खासदार लंके यांनी सांगितले की, सध्या कांद्याला बाजारात केवळ 10 ते 12 रूपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. उत्पादन खर्च 14 ते 15 रूपये प्रतिकिलो आहे. शेतकरी दर किलोमागे तोटाच सहन करीत आहेत. कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक आहे.
पण इतके कष्ट करून भाव मिळणार नसेल तर शेतकर्याला आत्महत्येच्या उंबरठयावर नेणारी व्यवस्था बदलली पाहिजे. यासाठी आम्ही संसदेत आवाज उठवतोय आणि रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणतोय.
खा. लंके यांनी कांदा निर्यातबंदीच्या धोरणावरही सडकून टीका केली. मागील 10-11 वर्षात केंद्र सरकारने 20 पेक्षा अधिकदा कांद्याची निर्यात बंदी केली आहे. अशा अनियमित धोरणांमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी झाली आहे. या धोरणामुळे निर्यातदारही अडचणीत आले असून, त्याचा फटका शेतकरी सहन करीत आहेत.