

राहुरी: कांद्याच्या शेतात फवारा मारायला चल, असे म्हणून पतीने पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे घडली.
शारदा लोंढे, वय 28 वर्षे ह्या सध्या त्यांचे आई वडिल यांच्याकडे कोकणगाव, ता. संगमनेर येथे राहण्यास आहे. दि.2 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शारदा लोंढे ह्या घरी असताना पती निखिल हा घरी दारू पिऊन आला व तीला म्हणाला की, कांद्याचे शेतात फवारा मारायला चल. त्यावर शारदा ह्या पती निखिल यास म्हणाल्या की, आज कांद्याचे शेत वाळलेले आहे. (Latest Ahilyanagar News)
अगोदर पाणी भरावे लागेल, मग फवारा मारता येईल. तेव्हा पती निखील याने पत्नी शारदा यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शारदाच्या डोक्याचे केस धरून पाच ते सहा वेळेस डोके भिंतीला आपटले. त्यामुळे शारदा ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांची सासू, मुलगा व मुलगी भांडण सोडविण्यासाठी आले असता निखील याने त्यांना देखील मारहाण केली. घटनेनंतर शारदा लोंढे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी पती निखील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.